नंदुरबार l प्रतिनिधी
येथील राष्ट्रवादी शहर युवक कॉंग्रेसतर्फे देशात वाढत असलेल्या महागाई विरुद्ध आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्याची परिस्थिती एकंदर खालोखाल जात आहे आणि अशी परिस्थिती असताना भारतीय जनता पार्टी आमदार खरेदी-विक्रीसाठी प्रचंड पैसा खर्च करीत आहे, एकेक आमदार विकत घेण्यासाठी अंदाजे ५०-५० कोटी रुपये आमदारांना दिले आहेत व त्यांच्या सुख सोयींसाठी त्यांना गुवाहाटीमध्ये त्यांच्यावर प्रचंड पैसा खर्च केला. यामुळे महागाईने दुखते डोके, गद्दारांना ५० खोके, ५० खोके, जनता भरते जीएसटी गद्दार जातात गुवाहाटी ५० खोके महागाई ओके, महागाई कशासाठी-आमदारांच्या खरेदीसाठी अशा घोषणा देत महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव राऊ दिलीपराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज राष्ट्रवादी शहर युवक कॉंग्रेसतर्फे महागाई विरुद्ध आंदोलन करण्यात आले. राज्यात पावसामुळे जे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे तेथे लक्ष न देता नेत्यांनी फक्त स्वतःची कॅबिनेट कशी बनवायची, स्वतःचा पक्ष कसा वाचवायचा, ही सत्ता कशी वाचवायची याबद्दलच संपूर्ण शक्ती पणाला लावली आणि एकीकडे राज्यातील जनतेला मोकळे रस्त्यावर सोडून दिले.
या विरोधात आज राष्ट्रवादी शहर युवक कॉंग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. लवकरात लवकर पावसामुळे झालेले नुकसान आणि वाढती महागाई यावर उचित व योग्य ते निर्णय नाही घेतले तर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
आंदोलनाप्रसंगी राष्ट्रवादीचे नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप, राष्ट्रवादी नंदुरबार तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष लल्ला मराठे, विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष बबलू कदमबांडे, युवक तालुकाध्यक्ष सुरेश वळवी, ओबीसी सेलचे जिल्हा समन्वयक निलेश चौधरी, शहर उपाध्यक्ष राजा ठाकरे, शहर कोषाध्यक्ष सुनिल राजपूत, अदनान मेमन, अनमोल पाडवी, राहुल जगदेव आदी उपस्थित होते.








