नंदुरबार l प्रतिनिधी –
आगामी काळातील कार्यक्रम, सभा व देशभरातील निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नडडा, गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रातील भाजपचे नेते, केंद्रिय मंत्री, पदाधिकारी देशभर प्रवास करणार आहेत. हा प्रवास नियोजनबद्ध व गुणात्मक, संख्यात्मक दृष्ट्या चांगला होण्याच्या दृष्टिकोनातून प्रदेश स्तरावर केंद्रीय नेता प्रवास योजना समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या प्रदेश सहसंयोजक (उत्तर महाराष्ट्र) पदी भाजपा नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांची नियुक्ती प्रदेशाचे अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
केंद्रातील मंत्री व भाजपाचे केंद्रातील नेते यांच्या प्रवासाच्या योग्य नियोजनाच्या दृष्टिकोनातून विजय चौधरी यांची सुयोग्य अशी नियुक्ती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. यामुळे विजय चौधरी यांचे केंद्रातील नेत्यांशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित होणार आहे. त्यांच्याशी सातत्याने संवाद आणि संपर्क देखील होणार आहे.
महाराष्ट्रात चार प्रमुख व्यक्तींची नियुक्ती केली असून यात विजय चौधरी यांच्या समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यातील विजय चौधरी यांच्यासारख्या कुशल संघटक असलेल्या कार्यकर्त्याला प्रदेशाने ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विजय चौधरी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.








