नंदुरबार l
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया त्वरित सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्यावतीने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
. उत्तर महाराष्ट्रात प्रथमच ग्रामविकास मंत्री पदाची जबाबदारी मिळाल्याने व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्यावतीने राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे, नाशिक विभागीय उपाध्यक्ष राकेश आव्हाड, जामनेर तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्यातर्फे ना.गिरीष महाजन यांचा सत्कार करण्यात आला.
राज्यातील आदिवासी दुर्गम भागासह राज्यातील इतर भागात कार्यरत प्राथमिक शिक्षक हे बदलीच्या आतुरतेने वाट बघत गेल्या पाच वर्षापासून बदली झाली नसल्याने शिक्षक मोठ्या प्रमाणात बदली प्रक्रियेसाठी आस लावून आहेत. तेव्हा जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया लवकर सुरू करावी या मुख्य मागणीचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. याबाबत ग्राम विकास विभाग स्तरावर कार्यवाही सुरू असून लवकरच बदली टप्पा क्रमांक तीन (जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया ) सुरू करण्यात येईल असे, आश्वासन याप्रसंगी ग्राम विकास मंत्री ना.महाजन यांनी दिले.
१० सप्टेंबर २०२२ रोजी नंदुरबार येथे जिल्हास्तरीय शिक्षक संपर्क मेळावा व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम असून या कार्यक्रमाचे निमंत्रण याप्रसंगी ग्राम विकास मंत्री महोदयांना देण्यात आले असून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले. ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर प्रथमच शिक्षक परिषदेचे निमंत्रण आल्याने आपल्या कार्यक्रमास अवश्य येईल, शिवाय शिक्षक पुरस्कार वितरण असल्याने शिक्षकांचा गौरव माझ्या हातून होणार असल्याचे भाग्य मला लाभणार असल्याचे सांगून कार्यक्रमास येण्याचे आश्वासन याप्रसंगी मंत्रीमहोदयांनी दिले. १० सप्टेंबर रोजी होणार्या नंदुरबार येथील कार्यक्रमास उपस्थितीबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना भ्रमणध्वनीद्वारे शिक्षक परिषदेचे पालक तथा शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी निमंत्रित केले. जामनेर येथील भेटीसाठी सामाजिक कार्यकर्ते माजी सैनिक किशोर पाटील, नगरसेवक गणेश पोळ, भारतीय जनता पार्टीचे कैलास पालवे, भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण लाडवंजारी, शिक्षक परिषदेचे जामनेर तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी यांनी दिली.








