नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने कृषी महाविद्यालय लोणखेडा येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेची एकदिवसीय कार्यशाळा झाली.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी कृषी महाविद्यालय प्राचार्य प्रकाश पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे, तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, नोडल अधिकारी विजय मोहिते व सर्व जिल्हा, तालुका समन्वयक उपस्थित होते. नंदुरबार जिल्हा संसाधन व्यक्ती विजय मोहिते भाग्यश्री राजपूत, राहुल इंगळे यांनी पीएमएफएमई संबंधित माहिती देऊन ऑनलाइन अर्ज करण्याची पूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली.

शहरातील युनियन बँकेचे शाखाधिकारी मयूर पाटील यांनी पीएमएफएमई योजनेत आवश्यक कर्ज सुलभतेने कशा पद्धतीने प्राप्त करून दिले जाईल याविषयी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
उपस्थित शेतकऱ्यांचे तब्बल 84 अर्ज मेळाव्यातच भरले गेले. उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे यांनी पीएमएफएमई या योजनेचा लाभ घेण्याकरता उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन केले. या मेळाव्यात तालुक्यातून दोनशेहून अधिक शेतकरी उपस्थित होते.








