नंदुरबार | प्रतिनिधी
पत्नीजवळ झोपण्याचा आग्रह धरणार्या तरुणाचा पतीने खून करुन मृतदेह शेतशिवारात फेकून दिल्याची घटना कामोद ता.नवापूर शिवारात घडली.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.११ ऑगस्ट रोजी रात्री कामोद ता.नवापूर येथे रविंद्र धिरजी गावित व दिलीप बाबजी गावित हे दारु पित होते. त्यावेळी दिलीप गावीत याने रविंद्र गावीत याला तुझी बायको कुठे आहे असे विचारले, त्यावर माझी बायको तिच्या माहेरी खोकसा येथे गेली आहे, असे सांगितले. तरीही दिलीपने आज मला तुझ्या बायकोजवळ झोपायचे आहे असे सांगुन त्याच्या पत्नीला घरात शोधू लागला. त्याचा राग आल्याने रविंद्र गावित याने दिलीप गावीत याच्या कानपटीत मारुन त्याचे डोके भिंतीवर आदळून जमिनीवर ढकलून जिवे ठार मारले.
पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मृतदेह कामोद गावाच्या शेत शिवारात वन विभागाच्या हद्दीत फेकुन दिला. याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप गावित यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रविंद्र धिरजी गावित याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भुषण बैसाणे करीत आहेत.








