नंदुरबार l प्रतिनिधी
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण ) अंतर्गत सन 2016-2017 ते 2020-2021 या कालावधीत घरकुल मंजूर होवून प्रथम हप्त्याचे अनुदान वितरीत करण्यात आलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या घरकुलाचे काम वेळेत पुर्ण करावे, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक आर.पी.पाटील यांनी केले आहे.
केंद्र व राज्य सरकार मार्फत ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील व सामाजिक, आर्थिक जात सर्वेक्षण 2011 नुसार कुटूंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (प्रपत्र-ब) व आवास प्लस ( प्रपत्र-ड ), राज्य पुरस्कृत शबरी आदिवासी घरकुल योजना, रमाई आवास योजना इत्यादी घरकुल आवास योजना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येत आहे.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत सन 2016-2017 ते 2020-21 याकालावधीत प्रपत्र ब मधील एकूण 1 लाख दोनशे सत्तर घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी 83 हजार 13 घरकुले पूर्ण करण्यात आली असून 17 हजार 257 घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच सन 2021-2022 मध्ये आवास प्लस (प्रपत्र ड ) योजनेतंर्गत 13 हजार 392 घरकुलांना मंजूरी देण्यात आली असून 10 हजार 507 घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण करण्यात आले असून घरकुलांचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील वेगवेगळया अडचणीमुळे अनेक घरकुल अपुर्ण असून ही घरकुल पुर्ण करण्यासाठी शासनाने महाआवास अभियान राबविले असून या अभियानात शासनाकडून दिलेले उद्दिष्ट पुर्ण करुन घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने सन 2016-2017 ते 2020-21 पर्यंतच्या रखडलेल्या घरकुलांना पूर्ण करण्याकरीता यंत्रणेकडून प्रत्यक्ष लाभार्थ्यांशी संवाद साधुन त्यांच्या अडचणी समजून घेऊन रखडलेली घरकुले पूर्ण करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.
ज्या लाभार्थ्यांनी घरकुल मंजूर होवून प्रथम हप्त्याचे अनुदान वितरीत होवूनही प्रत्यक्ष काम सुरु केले नाही अशा लाभार्थ्यांनी त्वरीत काम बांधकाम सुरु करावे. घरकुलाचे काम विहीत वेळेत पुर्ण न केल्यास लाभार्थ्यांकडून अनुदान वसूल करण्यात येणार असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर.पी.पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.








