नंदुरबार l प्रतिनिधी
धुळे-नंदुरबार रस्त्यावरील चौपाळे फाटा दरम्यान पडलेला भला मोठा पसरट खड्डा अपघाताला निमंत्रण देत आहे. रात्री-अपरात्री दुचाकीस्वारांना नजरेस येत नसल्याने अपघातात सामोरे जावे लागत आहे. यामुळे वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
धुळे-नंदुरबार रस्त्यावर दिवसाला हजारो वाहनांची वर्दळ असल्याने हा खड्डा दररोज अनेकांना त्रासदायक ठरत आहे. समोरून येणारे अवजड वाहन याठिकाणी आल्यावर दुचाकीधारकांना कसरत करावी लागत आहे. सदर खड्डा पसरट असल्याने दुचाकी घसरत असून सरळ समोरून येणाऱ्या वाहनात जात असल्याचेही चित्र आहे.
सुदैवाने यादरम्यान अद्याप मोठी घटना घडली नसून परंतु संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. संबंधित विभाग मोठा अपघात होण्याची वाट तर बघत नाही ना ? असा सवाल प्रवासी व वाहनाधारकांमध्ये उपस्थित होवू लागला आहे. वाहनधारकांनी तो खड्डा बुजविण्याचा प्रयत्न केला मात्र माती टाकली असूनदेखील मात्र दिवसेंदिवस मोठा होत असल्याने त्रासदायक ठरतोय. काही दिवसापूर्वी रजाळे येथील संग्रामसिंग गुलाझारसिंग गिरासे या तरूणाने सामाजिक बांधिलकी दाखवत या खड्डयात माती व मुरूम टाकून बुजविण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र पावसाच्या पाण्याने माती व मुरूम वाहून गेला आहे. आता तो खड्डा एक ते दीड फुट खोल झाल्याने दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहनधारकांना रात्रीच्या सुमारास अपघाताला सामोरे जावे लागत आहे. सदर खड्ड्यावर डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा वावद ते वैंदाणे परिसरातील वाहनधारक व प्रवासी रस्त्यावर उतरतील असा इशारा देण्यात येत आहे.