नंदुरबार ! प्रतिनिधी
नर्मदा काठावरील गावांना आवश्यक औषधांचा पुरवठा वेळेवर करण्यात यावा आणि आरोग्य केंद्राच्या ठिकाणी न रहाणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित गाभा आणि नवसंजीवनी समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी मैनक घोष, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड, प्रतिभा शिंदे, डॉ.कांतीलाल टाटीया, लतिका राजपूत आदी उपस्थित होते.
श्रीमती खत्री म्हणाल्या, मानव विकास कार्यक्रमांतर्गत गरोदर मातांना देण्यात आलेल्या बुडीत मजूरीच्या रकमेची वर्षनिहाय माहिती सादर करावी. 102 रुग्णवाहिका सेवेबाबत नागरिकांना माहिती देण्यात यावी. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिन्यातून एकदा ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी नवसंजीवनी योजनेअंतर्गत गावांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत घ्यावयाच्या कामांबाबत चर्चा करण्यात आली.