नंदुरबार | प्रतिनिधी-
हर घर तिरंगा अभियानांतर्गत नंदुरबार पालिकेतर्फे दहा हजार तिरंगा झेंडे वाटप करण्याचे नियोजन असून यासाठी शहरातील सेवाभावी संस्था, संघटनांची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत देण्यात आली.
येथील पालिकेची सभा येथील अटलबिहारी वाजपेयी सभागृहात आज घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी होते. यावेळी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, सर्व नगरसेवक, सभापती, मुख्याधिकारी अमोल बागुल, पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यंदा हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन सरकारने केले आहे. त्या पार्श्वभुमीवर नगरपालिकेने शहरात दहा हजार तिरंगा लावण्याचे नियोजन केले आहे. या तिरंग्यासाठी लागणारा खर्च शहरातील काही सेवाभावी संस्था, संघटनांमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी सभेत देण्यात आली.
शहरातील हुतात्मा शिरीषकुमार उद्यानाचा करार संपुष्टात आला असून नवीन करार देण्याबाबत यावेळी विषय मांडण्यात येवून त्यावर चर्चा करण्यात आली. तसेच कमलाताई मराठे व्यापारी संकुलातील हॉल भाडयाने देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. यावेळी पालिकेच्या विविध विभागांचा आढावा घेण्यात आला.