नंदूरबार l प्रतिनिधी
चार चाकी गाडीच्या चोरीच्या गुन्ह्याप्रकरणी न्यायालयाने गुरुवारी तिघा आरोपींना पुन्हा तीन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावल्याने त्यातील संतप्त एका आरोपीने तळोदा येथिल न्यायालयातील संगणक संचावर स्वतःचे डोके आपटल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. याबाबत आरोपी विरोधात तळोदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथील अशपाक चांद शेख, शरद नगर, हबीब मोहम्मद कासीम शेख,तांबरे, समद सलीम शेख रा.भिवंडी या तिघा आरोपीनी चार चाकी गाडी चोरून नेली होती. या प्रकरणी अक्कलकुवा पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांना अक्कलकुवा न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कस्टडी ही सुनावली. गुरुवारी या आरोपींना पुन्हा तळोदा न्यायालयात हजर करण्यात आले.
अधिक तपासासाठी अक्कलकुवा पोलिसांनी त्यांची पुन्हा पोलीस कस्टडी मागितली होती. त्यामुळे न्यायालयाने दोघा बाजूंचा युक्तिवाद ऐकून या तिन्ही आरोपींना पुन्हा तीन दिवसांची पोलीस कस्टडी दिली. त्यामुळे यातील एका संतप्त आरोपीने न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात न्यायालयामध्येच असलेल्या संगणकावर स्वतःचे डोके आपटले.
यात त्याला डोक्याला व गळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यास उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना न्यायालयातच घडल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी तळोदा पोलिसांत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गाडी चोरीच्या गुन्ह्यातील एका आरोपीने न्यायालयात स्वतःला गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्यानंतर अक्कलकुवा पोलीस उपविभागीय अधिकारी संभाजी सावंत यांनी तळोदा पोलीस ठाण्यात भेट देऊन या घटनेची माहिती जाणून घेतली यावेळी प्रभारी पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल उपस्थित होते.








