नंदुरबार | प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाच्या इस्कॉनतर्फे आज दि.५ जुलै रोजी जगन्नाथ रथयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
नंदनगरीत प्रथमच जगन्नाथ रथयात्रा निघाली यावेळी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होतेे. हरे रामा हरे कृष्णाचा जयघोषात हजारो भाविक सहभागी झाले होते.
इस्कॉन तर्फे अहमदाबाद, पुरी या सारख्या मोठ्या शहरांमध्ये जगन्नाथ रथयात्रा दरवर्षी काढण्यात येते त्याच धर्तीवर नंदुरबारात दि. ५ जुलैला कृष्णभावनामृत संघाचे संस्थापक कृष्ण कृपामूर्ति श्रीमद् ए.सी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या प्रेरणेने भव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आलेले होतेे.
शहरातील मोठा मारुती मंदिरापासून सुरू झालेले आहे या रथयात्रेत हरे रामा हरे कृष्णाचा जयघोष करीत भाविक तल्लीन झाले होते. टाळ मृदुंगाच्या जयघोषात रथ ओढण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. सर्वप्रथम रथाची पूजा केली.त्यानंतर रथ ओढून शोभायात्रेस प्रारंभ केला.
मोठा मारुती मंदिरापासून निघालेली रथयात्रा सोनी विहीर, शक्तिसागर चौक, भक्तीधाम मंदिर, दादा गणपती, शिवाजी रोड, चैतन्य चौक, जळका बाजार, टिळक रोड, सोनार खुंट ,बालाजी वाडा, महाराष्ट्र व्यायाम शाळा, गांधी पुतळा मार्गे नेहरू चौकातून पोलीस कवायत मैदानावर यात्रा पोहोचली.
या ठिकाणी सत्संगानंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दरम्यान जगन्नाथ रथयात्रा मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व पोलीस कर्मचार्यांनी वाहतूक सुरळीत करून सहकार्य केले.
इस्कॉन तर्फे दरवर्षी भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येते. अहमदाबाद, पुरी यांसारख्या मोठ्या शहरानंतर प्रथमच नंदनगरीत यात्रेचे आयोजन केले होते ३ जुलैला सुरतहून नंदुरबारात रथाचे आगमन झाले. रथाची आकर्षक सजावट करण्यात आली होती.