नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार रेल्वे स्थानक परिसरातील कंजरवाडा आणि रेल्वे कॉलनी परिसरातील नियंत्रण कक्षाच्या बाजूला असलेल्या एका गटाराच्या टाकीत वय अंदाजे अडीच ते तीन वर्ष असलेल्या बालिकेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या अबत अधिक माहिती अशी की, नंदूरबार येथील कंजरवाडा परिसरातील राहणाऱ्या दोन व्यक्ती सकाळी शौचालयास आल्यावर त्यांना दुर्गंधीचा वास आल्याने गटाराच्या टाकीत पाहिले असता बालिकेचा मृतदेह दिसून आला.
त्यांनी तत्काळ नंदुरबार पोलिसांना माहिती दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत अधिक तपास सुरू केला आहे. बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदानाच्या अहवाला नंतर सदर बालिकेच्या मृत्यूबाबत अधिक स्पष्टता होणार आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार सदर बालिकेचा मृतदेह कंजरवाडा व रेल्वे कॉलनी परिसरातील रहिवाशांपैकी नसुन रेल्वेने प्रवास करणाऱ्या किंवा बाहेरगावावरून एखाद्या व्यक्तीने सदर बालिकेवर अत्याचार करून गटाराच्या टाकीत फेकले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बालिकेच्या मृतदेहाच्या अवस्थेवरून तीन ते चार दिवसांपूर्वी घटना घडली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सदर घटनेबाबत नंदुरबार शहर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक अधिक तपास करीत आहे.