नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेटजवळ सुरतहून भुसावळकडे जाणाऱ्या रेल्वेतून खाली पडल्याने सुरत येथील एका ५५ वर्षीय व्यक्तीचे दोन्ही पाय मांडीपासून कापले गेल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना काल दि.४ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदलाल रामदास पाटील (५५) रा. मांडळ, ता.अमळनेर, जि. जळगाव हमु.रा. टीकमनगर, सुरत (गुजरात),
येथे उदरनिर्वासाठी आपल्या परिवारासह अनेक वर्षांपासून वास्तव्यास होते.
मयत नंदलाल पाटील हे मुडी मांडळ ता. अमळनेर, जि. जळगाव येथे नातेवाईकांकडे दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी जात होते दरम्यान काल दि. ४ जुलै रोजी सुरत-भुसावळ रेल्वे गाडीतून ४:३० वाजेच्या सुमारास चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेटजवळील रेल्वेखाली पडले.
या अपघातात नंदलाल पाटील यांचे दोन्ही पाय मांडीपासून कापले गेले. स्थानिक नागरिकांनी १०८ या रुग्णवाहिकेला संपर्क साधला. रूग्णावहिकरून तत्काळ अपघातग्रस्त व्यक्तीस विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन वसावे यांनी उपचार सुरू केले. पण उपचारादरम्यान संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला. यावेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र वळवी यांनी मृत व्यक्तीच्या खिशातील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल. त्यांच्या नातेवाईकांच्या शोध घेतल्यावर मृत व्यक्तीचे ही नंदलाल रामदास पाटील असल्याची माहिती मिळाली.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी व जावई असा परिवार आहे. घटनास्थळी नंदुरबार रेल्वे पोलीस पोलीस उपनिरीक्षक रजसिंग गावित, पोलीस हवालदार रवी पाटील, पोलीस नाईक जितेंद्र चौधरी, रेल्वे सुरक्षा बल पोलीस सचिन गावंडे, राहुल बैरागी यांनी पंचनामा केला.