नंदुरबार l प्रतिनिधी
पिक विमा योजनेने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसलेली आहेत. गेल्या वर्षी नंदुरबार तालुका दुष्काळ घोषित असतांना देखील पिक विम्याची रक्कम संबंधित कंपनीने देण्यास टाळाटाळ केली. विमा योजनेतुन पूर्ण नुकसान भरपाई न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
पिक विमा योजनेची चौकशी होऊन नुकसान भरपाई मिळावी यासाठी नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली, मांजरे, भादवड,ओसरली, शनिमांडळ, वावद, रनाळे,दहिंदुले,जून मोहिदे, हाटमोहिदे या गावांसह १५ ते २० गावातील २०० शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन दिले.
यावेळी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख कृष्णदास पाटील,सागर इंदानी,दिलीप पाटील,शरद पाटील, पवन काकड, गणेश पाटील,रोहिदास राजपूत, नारायण पाटील,नागेश्वर राजपूत, सचिन शिंदे,बाजीराव मराठे,पवन मराठे,राजाराम पाटील यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची भेट घेऊन चर्चा केली. मागील वर्षी पिक विमा काढला होता. शेतातील नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनामा पिक विमा कंपनी कडून करण्यात आला होता.
त्या अनुशंगाने विम्याची पिक कापणी प्रयोग तसेच २०२०-२०२१ वर्षाचे पीक घटाच्या आधारे रक्कम मिळणे क्रमप्राप्त असतांना देखील पिक विमा कंपनीने अजून पर्यंत कुठल्याही प्रकारचा नुकसान मोबदला दिलेला नाही. रक्कम कापणी प्रयोगा प्रमाणे शासनाच्या निर्देशनुसार पूर्ण दिलेली नाही त्यामुळे योग्य ती चौकशी होऊन विमा कंपनीला त्वरित नुकसान भरपाईचे निर्देश द्यावेत. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर असंख्य शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.
मागील वर्षी नंदुरबार तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला होता.पिक आणेवारी नुसार नुकसान भरपाई मिळावी. नुकसान झालेल्या पिकांच्या विमा कंपनीने शेतकऱ्यांना २ हजार,३ हजार ते ५ हजार अशी रक्कम दिली आहे. पूर्ण रक्कम देण्यास कंपनी टाळाटाळ करीत आहे.भरपाई न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण करण्यात येईल असे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख कृष्णदास पाटील यांनी सांगितले
अंदाजीत विम्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम
पिक विम्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसलेली आहेत. हेक्टरी २ हजार,३ हजार,५ हजार रुपये विमा मिळाला आहे. पीक विम्याची संपूर्ण नुकसान भरपाई मिळणे क्रमप्राप्त आहे. संबंधित कंपनीने अंदाजीत विमा काढून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला.
सागर इंदाणी,
शेतकरी, कोपर्ली