नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे ऑनलाईन वाहन पोर्टलवरील आरटीओचे युजर आय.डी.हॅक करुन विविध कंपनीच्या विविध मॉडेलच्या ८३ गाडया व्ही.आय.पी.नंबरने रजिस्टर करून ६६ लाख ५९ लाख ९०० रुपयाची फसवणुक केली म्हणून सर्व वाहन चालक व इतर एजंट यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे केला.
नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात नंदुरबार जिल्ह्यातील एक वाहन ट्रान्सफर करण्यासाठी गेले असता तेथील लिपीक यांना त्या वाहनाच्या आर . सी . बुकबाबत शंका आल्याने त्यांनी त्या वाहनाबाबत प्रादेशीक परिवहन कार्यालय नंदुरबार येथे चौकशी केली असता ते वाहन क्रमांक निवडक आकर्षक ( vip ) श्रेणीतला असल्याचे आढळून आले .
तसेच त्या क्रमांकावर कोणतेही वाहन क्रमांकाचे रजिस्ट्रेशन झालेले नसल्याचे दिसुन आले . त्यामुळे प्रादेशीक परिवहन कार्यालय , नंदुरबार येथील सर्व अभिलेख संबंधित लिपीक बागुल यांनी तपासले असता कोणीतरी बनावट आर . सी . बुक बनविल्याचे तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिल्लक असलेले निवडक / आकर्षक ( vip ) या क्रमांकाचा कोणीतरी वापर करीत असल्याचे निदर्शनास आले .
तसेच हस्तलिखीत अभिलेखावर नोंदी नसलेले ८३ निवडक / आकर्षक वाहन क्रमांकाबाबत धक्कादायक माहिती समोर आली .
सदर वाहन पोर्टलवरील बॅकलॉग साईटवर पाहणी केली असता ते वाहन क्रमांक रजिस्ट्रेशन असल्याचे दिसून आले . त्यामुळे सदरची बाब लिपीक श्री. बागुल यांनी तात्काळ सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव तसेच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांना कळवून परिवहन आयुक्त कार्यालय , मुंबई व वरीष्ठ अधिकार्यांना याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली होती .
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जावून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांची भेट घेतली व त्यांना घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती सांगितली .
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना चौकशी करण्याबाबत आदेश दिले . स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी सदर बाबत सखोल चौकशी केली असता शासनाला कोणताही टॅक्स न भरता वाहन रजिस्टर केल्याचे दाखविले .
तसेच विविध कंपनीच्या विविध मॉडेलच्या ८३ वाहनांच्या इंजिन नंबर किंवा चेसिस नंबरमध्ये खाडाखोड करुन शिवाय बनावट आर . सी . बुक तयार करुन शासनाची अंदाजित ६६ लाख ५९ हजार ९०० रुपयाची फसवणुक केली म्हणून ८३ वाहन धारक , एजंट , तसेच इतर संबंधीत व्यक्तींविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे . सदर गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असून गुन्ह्याच्या मुळापर्यंत जावून गुन्ह्यात सहभाग असणार्यांना लवकरच ताब्यात घेवून अटक करण्यात येईल . गुन्ह्यात सहभाग असणार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच सदर गुन्ह्यामध्ये शासनाची फसवणूक केल्यामुळे कोणाचीही गय केली जाणार नाही असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सांगितले .