नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील पाचअंबा येथे थकीत वीज बील लवकर भरण्याचे सांगितले. याचा राग आल्याने वीज कंपनीच्या महिला वरिष्ठ तंत्रज्ञास काठीने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी एकाजणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवापूर तालुक्यातील पाचअंबा येथील महाराष्ट्र राज्य वीज विद्युत कंपनीचे ग्रामीण १ चे वरिष्ठ तंत्रज्ञ सिंधू सुनिल वळवी यांनी सोनारसिंग साखऱ्या वळवी यांच्या सुनेला थकीत वीज बील लवकर भरण्याचे सांगितले.
याचा राग आल्याने सोनारसिंग वळवी यांनी सिंधू वळवी यांच्या घरी जावून शिवीगाळ केली. तसेच काठीने मारहाण करुन जखमी केले. याबाबत सिंधू वळवी यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात सोनारसिंग वळवी याच्याविरोधात भादंवि कलम ३२४, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक तेरसिंग वसावे करीत आहेत.