नंदुुरबार l प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील शासकीय आदिवासी मुलींच्या व वसतीगृहातील सिव्हील इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या कु.वैशाली तापीदास गावित या विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई यांनी गंभीर दखल घेतली असून पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय धुळे यांना सदर प्रकरणी चौकशी करून तात्काळ महाराष्ट्र राज्य महिला आयोगास अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष अर्जुनसिंग दिवाणसिंग वसावे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
याबाबत प्रसिध्दीस पत्रक दिले आहे. त्यात म्हटले आहे की, दोंडाईचा येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतीगृहात राहून सिव्हील इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या वैशाली तापीदास गावित (वय 19) ही नवापूर तालुक्यातील पिंपळे या गावाची रहिवासी होती. तीने वसतीगृहातच आत्महत्या केली.
आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. वसतीगृहाचे गृहपाल व इतर कर्मचार्यांचे विद्यार्थिनींकडे अजिबात लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. याचा तपास होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रचंड तणाव वस्तीगृहामध्ये विद्यार्थिनींमध्ये दिसून येत आहे.
वैशाली गावितच्या आत्महत्येमुळे मुलींचा संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच वसतीगृहातील इतर मुलींच्या शिक्षणावर मोठा परिणाम दिसून येत आहे.
या संपुर्ण घटनेची सखोल चौकशी होऊन गृहपाल व वसतीगृह प्रशासन अधिक्षक, प्रकल्प अधिकारी या दोषी अधिकार्यांवर चौकशीअंती फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात यावी.
जेणे करुन परत विद्यार्थिनींचे आत्महत्या सारखे प्रकार होणार नाहीत. मुलीच्या कुटूंबियांना मदत म्हणुन 25 लाख रुपये देण्यात यावे. शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह दोंडाईचा येथे विद्यार्थिनीच्या आत्महत्येची ही दुसरी घटना आहे.
सदर विद्यार्थिनीचे मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुलीची हत्या किंवा आत्महत्या हे संशयास्पद असल्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी. वसतीगृह प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. सदर प्रकरणाची सीआयडी चौकशी होणे गरजेचे आहे.
कु.वैशाली तापीदास गावित या विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी प्रकल्प अधिकारी तसेच वसतीगृह अधिकार्यांना जबाबदार धरण्यात यावे व त्यांच्याविरोधात कार्यवाहीचे आदेश द्यावेत. तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई यांनी या गंभीर प्रकरणी जिल्हा प्रशासनाला सखोल चौकशीचे आदेश देवुन आदिवासी विद्यार्थिनी वैशाली गावित यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आदिवासी महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष अर्जुनसिंग दिवाणसिंग वसावे यांनी केली होती.
या मागणीची महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई यांनी गंभीर दखल घेतली असून पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय धुळे यांना सदर प्रकरणी चौकशी करून तात्काळ महाराष्ट्र राज्य महिला आयोगास अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.