नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथे एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात वडील व मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, नंदूरबार तालुक्यातील सोनगीर पाडा येथील रहिवासी बंधू मोटु पवार व मुलगा मंगेश बंधू पवार दुचाकीने आष्टा मार्गे छडवेल कडे जात असताना ठाणेपाडा जवळील तीव्र उताराच्या वळण रस्त्यावर समोरून येणाऱ्या नाशिक नंदुरबार बसने धडक दिल्याने दोन्ही जण जखमी झाले.
या अपघातात मुलगा मंगेश पवार याचा पाय कापला गेला आहे. बसने दुचाकीला दिलेली धडक एवढी भीषण होती की दुचाकीवरील मंगेश पवार याचा पाय गुडघ्याच्या खालून कापला गेल्याने दूर फेकला गेला आहे. तर वडील बंधू पवार यांनाही डोक्याला व पायाला दुखापत झाली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघाताबाबत नंदुरबार तालुका पोलिसांना खबर दिली असून पुढील तपास सुरू आहे. अपघातानंतर बस चालक घटनास्थळावर न थांबता फरार झाला आहे.








