नंदुरबार | प्रतिनिधी
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयामार्फत होत असलेल्या चौकशी विरोधात नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले .
भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांना सक्तवसूली संचालनालयामार्फत नोटीस देण्यात आली . त्यानुसार दिल्ली येथे सक्तवसूली संचालनालयाच्या कार्यालयात दि.१३ जुन २०२२ रोजी चौकशीसाठी ते उपस्थित राहिलेत.

सुरु करण्यात आलेली त्यांची चौकशी सतत तीन दिवस सुरू ठेवून त्यांना मुद्दामहून त्रास दिला जात आहे . कॉंग्रेस पक्षाच्या वरीष्ठ केंद्रीय नेत्यास मुद्दामहून सतत चौकशीसाठी बोलावणे यासह भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या नवी दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयास पोलीसांकडुन घेराव घालणे ,
पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांना अकारण पोलीसांकडुन मारहाण होणे व त्यांना डांबुन ठेवणे असे प्रकार घडले आहेत .
या विरोधात नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे माजी मंत्री व कॉंग्रेसचे जेष्ठ नेते ॲड.पद्माकर वळवी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले .
केंद्रातील सरकार दडपशाहीचा मार्ग अवलंबुन लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्या सर्व सामान्य जनतेच्या प्रतिनिधींना आंदोलन करण्यापासून परावृत्त करीत असून या प्रकारातून घटनेची पायमल्ली करीत आहे .
या दडपशाहीचा जिल्हा कॉंग्रेस कमिटी , नंदुरबार निषेध करीत असून पक्षाच्या नेत्यांना नवी दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयात डांबुन ठेवून त्यांना मारहाण करणार्या अधिकारी व कर्मचार्यांचा शोध घेवून त्यांचे विरोधात भारतीय संहितेच्या प्रचलित कलमाखाली गुन्हे नोंदवून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी माजी मंत्री ॲड.. पद्माकर वळवी , जि.प सभापती अजित नाईक,जि. प.सभापती निर्मला राऊत ,जि. प. सदस्य सुहास नाईक, जि. प.गटनेते सी के पाडवी, सुरेश इंद्रजित, एजाज बागवान,सदस्य सुभाष पाटील,देवा चौधरी,सीताराम राऊत ,दि व्ही राजपूत व कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .








