अक्कलकुवा l प्रतिनिधी
कोराई ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी क्रांतिवीर बिरसा मुंडा संघटनेने केली असून याबाबत निवेदन अक्कलकुवा तहसीलदार यांच्यामार्फत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवण्यात आले.
क्रांतिवीर बिरसा मुंडा संघटनेची वतीने अक्कलकुवा तहसीलदार यांच्यामार्फत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले कि, अक्कलकुवा तालुक्यातील कोराई ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विकास कामांबद्दल ग्रामपंचायत कोराई येथील विद्यमान प्रभारी ग्रामसेवक सुरेश मोतीराम वसावे यांच्याकडून माहिती घेण्याच्या प्रयत्न केला परंतु ग्रामसेवक यांनी उडवाउडवीची उत्तर देऊन वेळकाढूपणा चालूच ठेवला व ग्रामपंचायतमध्ये विकास कामांसाठी शासन स्तरावरून कोट्यावधीची रक्कम हि ग्रामपंचायत कोराई प्राप्त झाल्यानंतर देखील कोराई गावात तटपुंज्या अश्या सुविधा पुरवून सुविधा पुरविल्या असल्याचा खोटा देखावा सबंधित ग्रामसेवक हे करीत आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील कोराई ग्रामपंचायतींवर भ्रष्टाचाराचा आरोप होत असून याविषयी तक्रार केलेल्या कोराई ग्रामपंचायतींच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यांनी दिले नाही .अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीत विविध योजनेत भ्रष्टाचार वाढला असून भ्रष्ट ग्रामसेवकांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थ समितीची सभा घेऊन कोराई ग्रामपंचयतींच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी वारंवार दिल्या असतांना अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायातीत शासनाच्या विविध योजना अंमलात आणल्या जात आहेत. यामध्ये १४ वित्त आयोग, ५ टक्के पैसा निधी, जनसुविधा निधी, नवीन शौचालय, बांधकाम दुरुस्ती, विहीर, रस्ते, वृक्षलागवड, अंगणवाडी-बालवाडी बांधकाम व दुरुस्ती आदी योजना प्रामुख्याने राबविण्यात येत असून यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी शासनाकडून मिळत आहे.
कोराई ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांच्या संगनमताने या योजनांची व त्यांच्या निधीचा गैरवापर केला जातो, अशा तक्रारी करण्यात आल्या आहेत. यातील काही ग्रामसेवकांवर टांगती तलवार असतांना कोराई ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक यांना निलंबित करण्यात आले नाही.
अक्कलकुवा तालुक्यातील कोराई ग्रामपंचायतीची चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी देणे अपेक्षित होते . कोराई ग्रामपंचायतींविरोधात भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी दिल्यानंतर व पंचायत समितीने देखिल या ग्रामपंचायतीची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करणे अपेक्षित होते.
ग्रामपंचायतीवर होणाऱ्या खर्चासाठी ग्रामसेवक व सरपंचांना संयुक्तपणे स्वाक्षऱ्यांचा अधिकार दिल्याने या दोघांनी संगनमताने वाटेल ती कामे केल्याचा धक्कादायक प्रकार कोराई ग्रामपंचायतीत घडल्याचे उघड झाले आहे. तसेच, सर्व नियम धाब्यावर बसवून खरेदी करतांना ३ लाखांवरील खरेदीला नियमानुसार ई-निविदा करणे बंधनकारक असतांना सर्व खरेदी परस्पर ठेकेदारामार्फत केली जात आहे.
ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारावर प्रशासनाचा कोणताही अंकुश नसून ग्रामसेवक सर्व नियम धाब्यावर बसवून वाटेल तसे आर्थिक व्यवहार करीत असल्याचे उघड झाले आहे. संबंधित कार्यालयाने याकडे पूर्णपणे काणाडोळा केल्याचे दिसून येत असून वरिष्ठ कार्यालयाकडून झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी क्रांतिवीर बिरसा मुंडा संघटनेच्या वतीने करीत आहे .
यावेळी तहसीलदार यांना निवेदन देताना क्रांतिवीर बिरसा मुंडा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय तडवी जिल्हा सचिव विनोद वसावे ,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष शब्बीर मक्राणी ,जिल्हा युवाध्यक्ष अफजल मक्राणी ,अमजत पठाण,सिकंदर मक्रानी,तालुका संघटक,यासिन निजामी उप तालुका संघटक ,अरुण पाडवी,रविदास तडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.