नंदूरबार l प्रतिनिधी
अश्लील व्हिडीओ कॉल करुन खंडणी मागणारा पोलीस कर्मचाऱ्यास जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी पोलीस खात्यातून निलंबीत केले आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा पोलीस ठाणे येथे भा.द.वि. कलम 384,385,389 , 363 , 323 , 504 , 506 , 34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 ( सी ) , 66 ( डी ) अन्वये अश्लील व्हिडीओ कॉल करणारी महिला, तथाकथीत पत्रकार अतुल रामकृष्ण थोरात ( चौधरी ), पोलीस अमंलदार नामे छोटुलाल तुमडु शिरसाठ यांच्या विरुद्ध दि. 31 मे रोजी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती .
दि. 1 जून रोजी तिन्ही संशयित आरोपीतांना न्यायालयात हजर केले असते न्यायालयाने तिन्ही
संशयित आरोपीतांना 7 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे . पोलीस दल हे शिस्तीचे खाते असून गैरकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची व त्यात सहभाग असणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श पी . आर . पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांना यापुर्वी सुचना दिल्या होत्या .
तरी देखील पोलीस मुख्यालय , नंदुरबार येथे नेमणुकीस असलेला पोलीस हवालदार बक्कल नंबर 780 छोटुलाल तुमडु शिरसाठ याचा नंदुरबार येथील महिला व तथाकथीत पत्रकारासह नमुद गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले . त्यामुळे त्यास नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी तात्काळ प्रभावाने पोलीस खात्यातून निलंबीत केले आहे .
नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अमंलदार यांचा कोणत्याही गैरकायदेशीर कृत्यात सहभाग असल्याचे आढळून आल्यास त्यांची गय केली जाणार नाही असे यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील यांनी सांगितले .








