मुंबई l प्रतिनिधी
‘तब्बल 73 वर्षांनंतर थॉमस कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने आज, 14 वेळा अजिंक्यपद जिंकलेल्या इंडोनेशिया संघाला 3-0 असं नमवून मिळवलेला विजय ऐतिहासिक आहे. या विजयाने भारतीय बॅडमिंटन क्षेत्राची, भारतीय क्रीडा जगताची मान उंचावली आहे.
पुरुष एकेरीतील विजेते लक्ष्य सेन आणि किदम्बी श्रीकांत, तसेच दुहेरी सामन्यातील विजेते सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन. तुमच्या कामगिरीने देशवासियांना अवर्णनीय आनंद दिला आहे. तुमच्या यशाचा देशाला अभिमान आहे. तुमचे यश हे भारतीय बॅडमिंटनच्या सुवर्णयुगाची सुरुवात आहे.’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अजित पवार यांनी थॉमस कप विजेत्या भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचं अभिनंदन केलं आहे.
बँकॉक, थायलंड येथील इम्पॅक्ट अरेना या मैदानात रविवार, १५ मे रोजी थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेचा अंतिम सामना रंगला होता. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा मुकाबला जागतिक दर्जाच्या इंडोनेशिया संघाशी झाला. स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये एकूण तीन सामने पार पडले.
पहिल्या सामन्यात भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष सेन याने भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्याने इंडोनेशियाच्या अंथनी गिनटिंग याचा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात ही आघाडी सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी वाढवली. त्यांनी इंडोनेशियाच्या मोहम्मद हस्सान आणि केविन संजय सुकामुलजो या जोडीचा पराभव केला.
अंतिम फेरीच्या अंतिम सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व किदांबी श्रीकांत करत होता. तर इंडोनेशिया कडून जॉनथन क्रिस्टी मैदानात उतरला होता. पण हा सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. २१-१५, २३-२१ अशा दोन सरळ सेटमध्ये क्रिस्टीचा पराभव करत श्रीकांतने विजयश्री खेचून आणली आणि भारताने इतिहास रचला.
भारताच्या ऐतिहासिक कामगिरीसाठी देशभरातून भारतीय बॅडमिंटनपटूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. भारताच्या या विजयाने इतर होतकरू खेळाडूंना प्रेरणा मिळेल असे पंतप्रधानांनी ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटले आहे.
जगातील नामवंत बॅडमिंटन स्पर्धा पैकी एक मानल्या जाणाऱ्या थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय संघ अजिंक्य ठरला आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी जिंकून भारताने इतिहास रचला आहे. थॉमस कप २०२२ मध्ये भारत विजेता ठरला असून भारताचे हे पहिलेच विजेतेपद आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघाने चौदा वेळा थॉमस कप विजेतेपद पटकावलेल्या इंडोनेशियन संघाचा पराभव केला.