नंदुरबार l प्रतिनिधी
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील पिंगाणे येथील महेश रविंद्र पाटील (ह.मु.बडोदा) हे दुचाकीने (क्र.जी.जे.०६ सीक्यू २१५१) पिंगाणे येथून बडोदाकडे अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाने जात होते. यावेळी एका ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र.जी.जे.०३ बीडब्ल्यू ४४५१) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन बेदरकारपणे भरधाव वेगात ट्रक चालवून कुंभारखान फाट्याजवळ समोरुन दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात महेश पाटील यांना गंभीर दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळी ट्रक सोडून पसार झाला. याबाबत बल्लू गोरख पाटील यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.गुरुदेव मोरे करीत आहेत.








