नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबारात शहरातील शाहु नगरात दरवाज्याचा कडी कोयंडा तोडुन अज्ञात चोरट्यांनी १ लाख १० हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नंदुरबार शहरातील शाहु नगरातील प्लॉट नं.३३ अ वर राहणारे किसनगीर काशिगीर गोसावी यांच्या बंद घराचे कुलूप व कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरटयाने आत प्रवेश केला. घरातील लोखंडी गोदरेज कपाटाचे लॉकर तोडून १ लाख १० हजाराची रोकड चोरून नेली. याबाबत किसनगीर गोसावी यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरूध्द नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय सोनवणे करीत आहेत.