म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील जयनगर येथील 33/11 केव्ही विद्युत उपकेंद्र असून याच्यावर शेतीसाठीचा विजेचा अतिरिक्त भार पडत असल्यामुळे वेळोवेळी वीज खंडित होत असून शेतकऱ्यांना शेतीसाठी पूर्ण आठ तास वीज मिळत नसल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी देणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून अतिरिक्त भार कमी करण्यासाठी येथील विद्युत उपकेंद्राची पावर ट्रांसफार्मरची क्षमता वाढविण्याची किंवा अजून एक नवीन विद्युत उपकेंद्र उभारण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
जयनगर येथे असलेल्या विद्युत उपकेंद्रातून शेतीसाठी जयनगर, कोंढावळ खापरखेडा, उभादगड, निंभोरे, धांद्रे बुद्रुक, धांद्रे खुर्द, कहाटूळ, लोंढरे या गावांच्या शेतशिवारात वीज पुरविली जाते. विद्युत उपकेंद्राला जोडलेली गावे जास्त असल्यामुळे या गावांमधील शेतातील डीपींची संख्या लक्षात घेता उपकेंद्रात ऊपलब्ध असलेल्या ट्रांसफार्मरची क्षमता कमी पडत आहे. त्यामुळे दिवसा व रात्री शेतीसाठी वीज पुरवठा होत असताना विद्युत उपकेंद्राला अतिरिक्त विजेच्या भारमुळे बाकी डीप्यांचे कनेक्शन तोडावे लागत आहे. शिवाय पूर्वी आठ दिवस दिवसा व आठ दिवस रात्रपाळी अशी शेतकऱ्यांना वीज दिली जायची. मात्र आता उपकेंद्रावर अतिरिक्त भार पडत असल्यामुळे पंधरा दिवसांपर्यंत रात्रपाळी व पंधरा दिवसांपर्यंत दिवस पाळी असे नियोजन करून शेतकऱ्यांना वीज दिली जात आहे. मात्र अतिरिक्त भारमुळे वेळोवेळी होत असलेल्या खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतीला पूर्णपणे आठ तास वीज मिळत नाहीये.
जयनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊस, पपई, केळी, मिरची पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. यांना सलग पाणी भरणे खंडित वीज पुरवठ्यामुळे शक्य होत नाहीये. तसेच रब्बी पिकांनाही खंडित वीज पुरवठ्यामुळे पाणी भरता येत नसल्यामुळे पिकांवर ताण पडत आहे. येथील उपकेंद्रात असलेला ट्रांसफार्मरवर अतिरिक्त भार पडत असल्यामुळे उपकेंद्राला वेळोवेळी वीज खंडित करावी लागत असल्याने शेतीसाठी पूर्ण आठ तास शेतकऱ्यांना वीज भेटत नसल्यामुळे शेतकरी वर्ग संतप्त झाला आहे.
नवीन विद्युत उपकेंद्राची मागणी
जयनगर येथे असलेल्या 33/11 उपकेंद्रात शेतीसाठी वीज पुरवठा करणाऱ्या गावांची संख्या जास्त असल्यामुळे अतिरिक्त विजेचा भार या उपकेंद्रावर पडत आहे. त्यामुळे येथील उपकेंद्राचा अतिरिक्त विजेचा भार कमी करण्यासाठी विद्युत उपकेंद्रात असलेल्या पावर ट्रांसफार्मरची क्षमता वाढवून द्यायला हवी किंवा कोंढावळ व खापरखेडा पैकी एका ठिकाणी स्वतंत्र विद्युत उपकेंद्र उभारायला हवे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.