नंदुरबार l प्रतिनिधी
उपविभागीय दंडाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या लाभात दिलेल्या आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी. आदेशाचा अनादर करणाऱ्या मुलांविरूद्ध कायदेशिर कार्यवाही व्हावी यासाठी पिडीत ज्येष्ठ नागरिक हे दि. २१ फेब्रुवारी पासून उपविभागीय अधिकारी, नंदुरबार यांचे कार्यालयासमोर प्राणांतीक उपोषण करणार असल्याची माहिती, आई वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बारकू पाटील यांनी दिली.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शांताराम चिंधु कलाल आणि सौ. सुशिला शांताराम कलाल हया वृद्धांनी त्यांची मालमत्ता सुनबाईच्या नावे करावी म्हणून विविध मार्गाने छळ करीत आणि धक्के मारीत गेल्या अडीच वर्षापुर्वी घरातून हाकलुन दिले आहे.
सनतकुमार अनिवृद्ध त्रिवेदी आणि कल्पना सनतकुमार त्रिवेदी हया वृद्ध दापत्यांना त्यांच्या सुनबाईने छळ करीत दि. २६ नोव्हेंबर २०२१ पासून घरातून काढून दिले आहे. सुदाम कोठाऱ्या वसावे हयांचा शासकीय सेवेत असलेल्या सुशिक्षीत मुलाने आई वडीलांची शेती व घर नावे करून घेवून त्यांचे वृद्धकाळात देखभाल करीत नाही. निळकंठ नथ्थु साळी, जगन रतन पटेल, पुंजीबाई जगन पटेल आदि सर्व पीडीत ज्येष्ठ नागरिकांच्या लाभात ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण आणि अपीलीय न्यायाधिकरणाकडून सुनावणी होवून सन २०१८ आणि २०२१ मध्ये आदेश पारीत करण्यात आले आहे. या आंदोलनास, मधुकर साबळे, अध्यक्ष नंदुरबार जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन , मगन पाटील , अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ प्रकाशा, प्रताप चव्हाण, अध्यक्ष जय श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघ, वडाळी , यांनी पाठींबा जाहिर केला आहे.