म्हसावद l प्रतिनिधी
मंजूर वनपट्टाधारक शेतकऱ्यांना ७/१२ मिळावा,प्रलंबित दावे निकाली काढावीत व वनगावांना महसूली दर्जा देण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री,पालकमंत्री व जिल्हाधिकारी नंदुरबार यांना बिरसा फायटर्सचे नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष गणेश खर्डे मलगाव यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,अनेक पिढ्यांपासून आदिवासी आपली वडिलोपार्जित वनजमीन उदरनिर्वाहासाठी कसत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी शेतकरी सतत मागणी करत आहे.अनेक मंजूर वनपट्टा धारक शेतकऱ्यांना गेल्या सहा-सात वर्षांपासून ताबा पावत्या मिळाल्या आहेत.परंतु,७/१२ उतारा अद्यापही न मिळाल्यामुळे शासनाच्या योजना व बँकेच्या पीक कर्जापासून वंचित राहावे लागत आहे.अद्यापही हजारो वनदावे प्रलंबित आहेत.
स्वातंत्र्याचा ७५ वर्षानंतर ही जिल्ह्यातील शेकडो गावांना महसुलीचा दर्जा मिळालेला नाही. शहादा तालुक्यातील मलगांव.भुलाने.चांदसैली. दुधखेडे.वडगाव.तितरी. मानमोडे.लंगडी. वाघडे.नवानगर.राणीपुर. शहाणे अशी अनेक गावे आहेत.अशीच,परिस्थितीधडगाव,अक्कलकुवा, शहादा तालुक्यात आहे.आजही महसुली दर्जाची प्रतीक्षा आहे.स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करीत असतांना आदिवासी आजही उपेक्षितांचे जीवन जगत आहे.आजही अनेक आदिवासी पाड्यात पाण्याची,विजेची, आरोग्य,शिक्षण,रस्ते या मूलभूत सुविधा नाहीत.वर्षानुवर्षे सरकार,प्रशासन व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहे.








