नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार ते निझर रस्त्यावर ट्रकने धडक दिल्याने ६० वर्षीय इसम ठार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एकाविरूद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील राजसिटी येथील सुदाम लक्ष्मण जाधव (वय ६०) हे दुचाकीने नंदुरबार ते निझर रस्त्याने जात होते. यावेळी सुदाम गंगाधर चित्ते रा.श्रीरामनगर, पंचवटी नाशिक याने त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र.एम.एच.१५ ईएफ ५०४०) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव दुचाकीला मागून धडक दिल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात सुदाम जाधव यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी वासुदेव दगा मराठे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात चालक सुदाम चित्ते याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४(अ), २७९, ३३७, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक यादव भदाणे करीत आहेत.