नंदूरबार l प्रतिनिधी
पर्यटनस्थळांवर विविध उपाययोजना करण्यासाठी शासनाने सन २०२१-२२ मध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत अक्कलकुवा व अक्राणी तालुक्यातील विविध पर्यटन विकास कामांसाठी १ कोटी ७८ लाख ६५ हजारांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत पर्यटनस्थळांच्या सौंदर्यीकरणासह पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या अनुषंगाने जिल्हास्तरावरील नवीन कामांना निधी उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या माध्यमातून अक्कलकुवा व अक्राणी तालुक्यातील स्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास करून पर्यटकांसाठी अधिक सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत.
राज्यात कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले. आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असताना सर्वाधिक रोजगार निर्मिती क्षमता असलेल्यांपैकी या क्षेत्राकडे पर्यटकांना आकर्षित करून त्यांच्यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत असल्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
अक्कलकुवा व पर्यटन विकास कामे
सोरापाडा येथील अक्कलकुवा जवळ वरखेडी नदीच्या पश्चिमेस संरक्षण भिंत बांधणे, सोरापाडा येथील महाकाली मंदिराजवळ सांस्कृतिक भवन बांधणे , ता . अक्कलकुंवा, सोरापाडा येथील महाकाली मंदिराच्या आवारात भक्त निवासासह व्यापारी संकुल बांधणे , ता . अक्कलकुंवा , डाब देवगोई येथे भक्त निवास बांधणे,डाब देवगोई येथे घाटाचे बांधकाम करणे, डाब देवगोई येथे पायऱ्या बांधकाम करणे, प्राचीन शुलपापणेश्वर महादेव परिसरात स्वच्छतागृहाचे बांधकाम करणे यासाठी १ कोटी २० लाख तर अक्राणी तालुक्यातील तोरणमाळ येथे प्रवेशव्दाराचे बांधकाम करणे, तोरणमाळ कक्ष क्र . १२१ परिसरात चौकोनी प्रकारात हट बांधणे, तोरणमाळ कक्ष क्र . १२१ परिसरात गोल प्रकारात हट बांधणे, तोरणमाळ कक्ष क्र . १२१ परिसरात त्रिकोनी प्रकारात हट बांधणे, तोरणमाळ कक्ष क्र . १२१ हट परिसरात तारेचे कुंपन करणे, तोरणमाळ कक्ष क्र . १२१ हट परिसरात वॉच टॉवर उभारणे यासाठी ५८ लाख ६५ हजाराचा निधी उपलब्ध करून दिला आहे.याठिकाणी सुशोभिकरण, नवीन उपक्रम राबविणे तसेच पर्यटकांसाठी सुविधा निर्मिती केली जाणार आहे.








