नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर औद्योगिक परिसरात उद्योग उभारण्यासाठी पॉलीफिल्म प्रा. लि. कंपनीने पुढाकार घेतला असून सुमारे पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची कंपनीने तयारी दर्शविली आहे. याद्वारे आदिवासी भागात सुमारे दोन हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.
नवापूर येथे येणाऱ्या कंपन्यांना या कंपनीला सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाने केली आहे. दरम्यान, लगतच्या सुरत परिसरातील अनेक उद्योगांनी नवापूर येथे उद्योग विस्तार करण्यात स्वारस्य दाखविले आहे. याबाबत महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ संचालकांच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. इव्ही चार्जिंग स्टेशनसाठी प्राधान्याने भूखंड
विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी एमआयडीसीकडून प्राधान्यांने भूखंड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. दुचाकी तसेच चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी भूखंड उपयुक्त ठरेल. राज्य शासनाने अलिकडेच घोषित केलेल्या ईव्ही धोरणाची प्रभावी अमंलबजावणी होण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा निर्धार केला असल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले.महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या नवापूर तालुक्यात औद्योगिक परिक्षेत्रात मोठे उद्योग आल्यास येथील आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
नंदुरबार जिल्ह्यात औद्योगिक परिक्षेत्रात कमी गुंतवणूकिमुळे रोजगाराच्या संधी कमी असल्याने येथील नागरिकांना रोजगारासाठी परराज्यात जावे लागते.