नंदूरबार l प्रतिनिधी
राज्य सरकार विरोधात संपावर उतरल्यामुळे परिवहन विभागाने निलंबित केल्यानंतर सात जणांच्या उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने तळोदा येथील बस वाहकाने भोजनालय सुरू केले आहे.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील वडवणी येथील सतीश नारायण मुंडे हा तरुण सन 2014 मध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागात वाहक म्हणून नोकरीस लागला होता. त्यास अक्कलकुवा आगारामध्ये नियुक्ती देण्यात आली होती. साधारण 14 हजार रुपये वेतनावर ते काम करीत असत. वेतन वाढीसाठी एस.टी. महामंडळातील चालक व वाहक यांनी राज्य सरकार विरोधात संप पुकारला आहे. शासनाने वेतन वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतरही वाहक,चालक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.त्यामुळे महामंडळाने कर्मचार्यांवर निलंबनाचे अस्त्र उगारले आहे.
अक्कलकुवा डेपोतील वाहक सतीश मुंडे यांच्यावरही पहिल्याच टप्प्यात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नोकरी गेल्यानंतर ते बेरोजगार ठरले आहेत. आई,वडिलांसह सात जणांचे कुटुंब त्यांचावर अवलंबून असल्यामुळे त्यांच्यापुढे उदर निर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तथापि घराची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असल्यामुळे त्यांच्यापुढे व्यवसायासाठी आर्थिक भांडवलाच्याही प्रश्न होता. निलंबनानंतर त्यांनी मिळेल ते काम रोजंदारीवर केले.
मात्र एवढ्याशा मजुरीवर सात लोकांचे पोषण अशक्य होत असे. शेवटी त्यांनी आपले मित्र, नातेवाईक यांच्याकडे हात पसरवून पैसे गोळा केले. शिवाय काही रक्कम व्याजाने देखील काढली. या छोट्या रकमेतून त्यांनी तळोद्यात लहान भोजनालय सुरू केले आहे
सध्या ग्राहकांच्या अल्प प्रतिसाद मिळत असला तरी सात जणांचे पालन पोषणास पुरेसे ठरत आहे. वास्तविक महामंडळातील नोकरीत अतिशय अल्प वेतन मिळत आहे. त्यात कुटुंबाचा प्रपंच चालविणे अवघड ठरत आहे.त्यात चांगली वाढ होने अपेक्षित असताना आम्हा कर्मचार्यांवर राज्य सरकारने निलंबनाचा फास आवळला आहे. सरकारच्या या भूमिकेबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.