तळोदा l प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनानिमित्त ग.स.बँकेत ध्वजारोहणाची तयारी करणारे बँकेचे शिपाई कर्मचारी महेंद्र नानागिर बावा यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,प्रजासत्ताक दिनानिमित्ताने तळोदा घसा बँकेच्या शाखेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या तयारीसाठी बँकेच्या शाखेचे शिपाई महेंद्र बावा सकाळी ७ वाजेच्या अगोदरच शाखेत पोहोचले.पोहचल्यानंतर त्यांनी ध्वजारोहणाची उर्वरित तयारी पूर्ण केली व शाखाधिकारी प्रविण गोसावी फोन करून ‘नारळ,अगरबत्ती व इतर पूजेचे साहित्य सर्व आणले आहे,तुम्ही फक्त ताजी फुले घेऊन या’ असे सांगितले. त्यानुसार शाखाधिकारी प्रविण गोसावी व काही नंदूरबारहून येणारे कर्मचारी सव्वा सात ते साडे सातच्या सुमारास शाखेत दाखल झाले.त्यातील काही जण ध्वजारोहणासाठी वर टेरेस गेले तर एक दोन जण खाली होते.महेंद्र बावा हे काही साहित्य घेण्यासाठी खाली आले होते.खालून वर जातांना ते जीन्यात अचानक कोसळले. हा प्रकार खाली असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली.वर ध्वजारोहणासाठी जमलले सर्व कर्मचारी धावत खाली आहे.क्षणभर काय झाले कुणाला कळत नव्हते.त्यानंतर शाखाधिकारी गोसावी यांनी त्यांच्या प्रथमोपचार देण्यास सुरुवात केली व त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळत नव्हता.त्यानंतर महेंद्र बावा यांना तातडीने तळोदा शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु त्याठिकाणी त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
महेंद्र बावा हे मागील पंधरा वर्षाहून अधिकचा काळ ग.स.बॅंकेत शिपाई म्हणून काम बघत होते. याशिवाय ते दररोज सायकलवर फिरून दैनिक ठेवी जमा करण्याचे काम देखिल करत होते.घरची साधारण परिस्थिती असणारे महेंद्र बावा हे त्यांच्या मनमिळाऊ स्वभाव व सर्वांना मदत करण्याच्या वृत्तीमुळे भाऊसाहेब सर्वांच्या परिचित होते.त्यांना पच्यात पत्नी व दोन असा परिवार आहे. त्यांच्या अशा प्रकारे अनपेक्षितपणे मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबासह मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.