तळोदा । प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती रांझणी येथील विठ्ठल- रुखमाई मंदिरात सलग दुसर्या वर्षी कोरोना संकटामुळे यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे.
याबाबत विठ्ठल-रुखमाई मंदिर सेवा समिती, ग्रामस्थ, पोलिस प्रशासन यांनी कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नसल्याने तसेच शासनाच्या वतीने यात्रा, उत्सव, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यात्रा रद्द झाल्यामुळे विठुरायाचे भक्त, वारकरी यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
दरम्यान आषाढी एकादशी निमित्त तालुक्यासह जिल्हाभरातून हजारो भाविक दर्शनासाठी रांझणी येथे येत असल्याने यात्रोत्सवात गर्दी राहिल्याने छोटे-मोठे व्यावसायिक ही मोठ्या प्रमाणावर येत असतात. परंतू यावर्षी सुध्दा यात्रोत्सव रद्द झाल्याने आर्थिक उलाढाल ही थांबणार आहे. तसेच परिसरातील चिनोदा, तळवे, पाडळपूर, बालदासह अनेक गावातून येणाऱ्या वारकरींच्या दिंड्या, रिंगण सोहळा यांना ही ब्रेक लागला आहे.
आषाढी एकादशी निमित्त यात्रोत्सव रद्द झाला असून व्यावसायिकांनी येऊ नये. तसेच भाविकांनीही दर्शनासाठी येऊ नये. सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. असे आवाहन विठ्ठल-रुखमाई सेवा समिती रांझणी.ता.तळोदा यांनी केले आहे.