नंदुरबार l प्रतिनिधी
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेमार्फत दि.२२,२३ व २४ जानेवारी रोजी ऑनलाईन होणाऱ्या दुसऱ्या विश्व अहिराणी संमेलनात साक्री तालुक्यातील काटवान परीसरातील इतिहास संशोधक प्रा.डॉ.सर्जेराव भामरे व कथा लेखिका सौ.वृषाली खैरनार यांचा समावेश परिसंवाद व अहिराणी कथाकथनात करण्यात आला आहे.
या विश्व अहिराणी संमेलनात अहिराणी भाषिक संस्कृतीच्या ऐतिहासिक, पारंपारिक, साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, औद्योगिक पाऊलखुणा जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दि.२३ जानेवारी रोजी सायंकाळी चार ते साडेसहा वाजे दरम्यान होणा-या परिसंवादात साक्री तालुक्यातील मालपूर येथील इतिहास संशोधक प्रा.डॉ.सर्जेराव भामरे यांचा ‘कान्हदेशचा इतिहास’ या विषयावर सहभाग आहे. तर याच दिवशी सहा वाजता सादर होणाऱ्या कथाकथन सत्रात साक्री तालुक्यातील विटाई येथील सौ. वृषाली नरेंद्र खैरनार यांची कोरोना काळातील ग्रामीण भागाचे वास्तव दर्शविणारी ‘आंतर’ ही कथा सादर केली जाणार आहे.
हे दोन्ही कार्यक्रम ऑनलाईन पाहण्यासाठी https://youtu.be/H6C5djFy7-w या यू ट्यूब लिंकचा उपयोग करावा.
या दुसऱ्या विश्व अहिराणी संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण यांची तर संमेलनाध्यक्ष म्हणून कसमादे पट्ट्याचे अहिराणी वैभव डॉ.एस.के.पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
या संमेलनात जगभरातील अहिराणी भाषिकांच्या कथा,काव्य, नृत्य,नाट्य, उद्योग, सांस्कृतिक परंपरा यांना उजाळा दिला जाणार आहे. यासाठी चालू वर्षी जगभरातील ३० ते ३५ देशातील अहिराणी भाषिक खान्देशी बंधू-भगिनी सहभागी होतील. असा विश्वास उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील , कार्याध्यक्ष बापूसाहेब हटकर जागतिक अहिराणी संवर्धन परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब पिंगळे, सचिव साक्री येथील माध्य.शिक्षक प्रमोद कुवर, खान्देश विभाग विकास कार्यकारिणीचे सचिव डॉ.नरेंद्र खैरनार यांनी व्यक्त केला आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव जिल्ह्यातील अहिराणी भाषिकांनी या संमेलनातील कार्यक्रमांचा घरी बसून ऑनलाईन आस्वाद घेण्याचे आवाहन या मान्यवरांनी केले आहे.