नंदुरबार l प्रतिनिधी
माझी वसुंधरा अभियानांतर्गत बामखेडा तत ता. शहादा येथे ग्रामस्थ व पदाधिकारी यांच्या समन्वयातून उत्कृष्ट काम .सुरु आहे. ग्रामस्थांनी यापुढेही असाच उत्स्फूर्त लोकसहभाग कायम ठेवून पृथ्वी ,वायू, जल ,अग्नि व आकाश या पंच महाभूतांचे संरक्षण करुन गावाला अभियानांतर्गत राज्यात पहिले बक्षीस मिळवून द्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.
बामखेडा तत तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण संरक्षणासाठी लोकसहभाग व शासनाच्या विविध विभांगाच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आढावा घेणे साठी सर्व विभाग प्रमुख यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी बैठकीस उपस्थित ग्रामस्थ व अधिकारी यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. योवळी ते म्हणाले की, पर्यावरण व निसर्गाच्या संरक्षणासाठी पंचमहाभूतांचे संरक्षण ही काळाची गरज आहे. मानवी अस्तित्वासाठी पृथ्वी जल वायू आकाश आकाश व अग्नी या पंचमहाभूतांना प्रदूषण मुक्त करावे यासाठी वृक्ष लागवड व त्यांचे संरक्षण सांडपाणी व घन कचऱ्याचे व्यवस्थापन पाणी अडवणे व जिरवणे अपारंपारिक ऊर्जास्रोतांचा वापर करून वायू प्रदूषण टाळावे यासाठी सौर ऊर्जा बायोगॅस यासारखे उपक्रमांचे यशस्वी अंमलबजावणी करणेची आवश्यकता आहे. या सर्व बाबींची अंमलबजावणी बामखेडा या गावात उत्कृष्ट सुरु असून ही बाब कौतुकास्पद आहे . यापुढेही ग्रामस्थांनी पर्यावरण रक्षणासाठी असेच योगदान द्यावे असे आवाहन ही यावेळी गावडे यांनी केले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रत्येक विभागाने ग्रामपंचायतीने तयार केलेल्या कृती संगम आराखड्यानुसार आपली कामे वेळेत पूर्ण करावीत याबाबत आदेशीत केले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार , उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील , कृष्णा राठोड ,कार्यकारी अभियंता ( ग्रापापु) बावीस्कर, कार्यकारी अभियंता ( बांधकाम ) एस.व्ही. पवार , शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) डॉ. युनूस पठाण , गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे , सरपंच मनोज चौधरी उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे व उपस्थित अधिकारी यांनी ग्रामपंचायतीमार्फत लावण्यात वृक्षांची पाहणी केली. तसेच स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत गावात सुरु असलेल्या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामांची पाहणी केली. या नंतर वृक्ष मंदिर येथे भेट देऊन लोकसहभागातून लावण्यात आलेल्या विविध वृक्षांचे पाहणी करून त्यांची अद्यावत माहिती दप्तरी कसे ठेवावी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच ग्रामस्थांना माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण रक्षणासाठी व स्वच्छतेचे शपथ दिली. या प्रसंगी सरपंच मनोज चौधरी, विस्तार अधिकारी मनोज देव, ग्रामसेवक मनीष रामोळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुनील पाटील आदींसह ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.