नंदुरबार ! प्रतिनिधी
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प नंदुरबार अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी रिक्त असलेल्या जागासाठी संबंधित गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून २८ जुलै २०२१ पर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना नंदुरबार येथे अर्ज मागविण्यात आले आहेत.
गंगापूर क्र.१, टाकलीपाडा, केसरपाडा, भवानीपाडा, चौपाळे क्र.५ येथील अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका ५ रिक्त पदासाठी तसेच सुतारे, धुळवद, कोठडा, शिरवाडे, सुदरर्दे क्र.२, उमर्दे ब्रु.१, घुली, जांभीपाडा अंगणवाडी केंद्रातील मदतनीसाच्या ८ रिक्तपदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी केवळ त्या गावातील महिला स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय ३० जून २०२१ रोजी २१ वर्ष पूर्ण ते ३२ वर्षांच्या दरम्यान असावे. अर्जदारास २ अपत्याचे वर अपत्य नसावे. अंगणवाडी सेविकेसाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण ते उच्चत्तम तर मदतनीस पदासाठी सातवी उत्तीर्ण ते उच्चत्तम अशी आहे.
अर्जदार विधवा असल्यास गट विकास अधिकारी अथवा तहसिलदार यांचा दाखला जोडावा. विधवा व अनाथ उमेदवारास अतिरिक्त १० गुण देण्यात येतील. सक्षम प्राधिकार्याने वितरीत केलेला जातीचा दाखला, मागासवर्गीय उमेदवारास एससी व एसटी साठी १० गुण तर व्ही.जे.एन.टी,ओबीसी, एस.बी.सी साठी ५ अतिरिक्त गुण देण्यात येतील. बारावी नंतर अर्जदार पदवीधर, डिएड, बीएड केले असल्यास अतिरिक्त ५ गुण देण्यात येतील. अंगणवाडी सेविका व मदतनीस कामाचा दोन वर्ष व त्यापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव असल्यास सक्षम अधिकार्याचा दाखला जोडावा. रिक्त पदांमध्ये बदल होण्याची शक्यता असल्यास बदलाबाबत वा भरतीप्रक्रिया स्थगित करण्याबाबतचे अधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी यांना राहील. शैक्षणिक पात्रतेसंबंधी व अर्जासोबत जोडलेले सर्व प्रमाणपत्र साक्षांकित केलेले असावे.
विहीत नमुन्यातील अर्ज आणि इतर माहितीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, नंदुरबार येथे संपर्क साधावा असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी साईनाथ वंगारी यांनी केले आहे