नंदुरबार l प्रतिनिधी
आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पोलीस सेवा किंवा मदत एकाच टोल फ्री क्रमांकावर मिळावी म्हणून डायल 112 ही आपत्कालीन सुविधेसाठी डायल 112 द्वारे खोटी माहिती दिल्या प्रकरणी लोणखेडा ता . शहादा येथील इसमाविरुध्द् गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पोलीस सेवा किंवा मदत एकाच टोल फ्री क्रमांकावर मिळावी म्हणून डायल 112 ही आपत्कालीन सुविधा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सुरु करण्यात आलेली आहे . डायल 112 या क्रमांकाद्वारे प्राप्त होणारे सर्व कॉल प्राथमिक संपर्क केंद्रावर तसेच द्वितीय संपर्क केंद्रावर प्राप्त होतात . कॉल करणाऱ्या व्यक्तीला आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक मदत तात्कामिळण्याकरीता त्या व्यक्तीच्या रिअल टाईम लोकेशनच्या आधारे सदरचे कॉल संबंधीत आयुक्तालयाच्या किंवा जिल्ह्याच्या पोलीस नियंत्रण कक्षाकडे तसेच आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका , अग्निशमन इत्यादींसारख्या सेवांकडे वर्ग करण्यात येत असतात . तसेच 10 मिनिटाच्या आत सर्व नागरिकांना आपत्कालीन सेवा पुरविली जाते . परंतु काही नागरिक 112 या क्रमांकावर डायल करुन खोट्या व तथ्यहीन बाबींना तक्रारीचे स्वरूप देवून पोलीसांच्या वेळेचा अपव्यय करतांना आढळुन येत आहेत . तसेच पोलीसांना त्रास व्हावा या उद्देशाने काही खोडसाळ नागरिक या सेवेचा दुरुपयोग करीत असल्याचे आढळून आले आहे . दि. 18 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास एका व्यक्तीने 112 हा क्रमांक डायल करुन सांगितले की , लोणखेडा परिसरात 20 ते 30 लोकांचा जमाव जमलेला असुन ते आप – आपसात मारामारी करीत आहे . त्यामुळे सदरची माहिती नियंत्रण कक्षाकडून तात्काळ शहादा पोलीसांना दिली असता शहादा पोलीस ताबडतोब लोणखेडा येथे गेले परंतु तेथे कोठेही मारामारी किंवा जमाव जमलेला नसल्याचे समजुन आले . तसेच तेथील नागरिकांना देखील विचारपूस करण्यात आली परंतु तेथील स्थानिक नागरिकांनी देखील तसा कोणताही प्रकार झाला नसलयाचे सांगितले . त्यामुळे घटनास्थळावर पोहचलेल्या शहादा पोलीसांची खात्री झाली की , पोलीसांना त्रास व्हावा या खोडसाळ वृत्तीने कोणी तरी अज्ञात व्यक्तीने डायल 112 द्वारे पोलीसांना खोटी माहिती दिलेली आहे . शहादा पोलीसांनी तात्काळ सदर माहिती ही पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना कळवताच त्यांनी शहादा येथे डायल 112 या क्रमांकावर कॉल करून खोटी माहिती देणाऱ्याचा शोध घेणेबाबतची माहिती घेण्यासाठी नियंत्रण कक्ष नंदुरबार यांना आदेश देवून पुढील कायदेशीर कारवाई करणेबाबत सांगितले .नियंत्रण कक्ष नंदुरबार येथे डायल 112 कक्षात नेमणुकीस असलेले पोलीस निरीक्षक श सुनिल नंदवाळकर , पोलीस हवालदार भुषण खंडारे , अल्तापअली सैय्यद , सूर्यकांत तायडे , रितु गावीत , इंदीरा वळवी पोलीस नाईक संजय साळवे , दिपा पवार यांनी दि. 18 जानेवारी रोजी डायल 112 द्वारे खोटी माहिती देणाऱ्या इसमाची माहिती काढली असता त्याचे नांव दिपक भटु सदाणे रा . बजरंग नगर , लोणखेडा ता . शहादा असे असल्याचे समजले . डायल 112 वर खोटी माहिती देणाऱ्याची संपूर्ण माहिती नियंत्रण कक्ष नंदुरबार येथून ताबडतोब शहादा पोलीसांना देण्यात आली . शहादा पोलीसांनी लोणखेडा परिसरात जावून दिपक भटु सैंदाणे याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले . तसेच त्याच्याकडे विचारपुस केली असता दिपक सैंदाणे याने सांगितले की पोलीसांना त्रास व्हावा याद्वेषबुध्दीने खोटा कॉल केल्याचे सांगितले म्हणून दिपक भटु सैंदाणे यांच्या विरुद्ध शहादा पोलीस ठाणे येथे भा.द.वि. कलम 182 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील कारवाई सुरु आहे . नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की , तक्रार सत्य व खरी असल्याशिवाय डायल 112 हा नंबर डायल करु नये तसेच 112 या क्रमांकावर खोटी माहिती देवू नये . खोटी माहिती देणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील असे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सांगितले आहे .