नंदुरबार | प्रतिनिधी
वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखाली नंदुरबार येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांचे संलग्नित रुग्णालय बांधकामासाठी उच्चस्तर समितीने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने रुपये ५३२ कोटी ४१ लक्ष इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ड.के.सी.पाडवी यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन या संदर्भात पाठपुरावा केला होता.
वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि अनुषंगिक बांधकामासाठी मौजे टोकर तलाव शिवारातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची १९.६३ हे.आर. क्षेत्र हस्तांतरित करण्यात आले आहे. या जागेवर आवश्यक बांधकामासाठी प्रशासकीय मान्यतेसंदर्भातील शासन निर्णय निर्गमीत करण्यात आला आहे. बांधकामासाठी संबंधित विभाग आणि प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेण्यात यावी. स्थापत्य कामाच्या कालावधीतच विद्युतीकरण आणि इतर अनुषंगीक कामाचे योग्य नियोजन करून कामे पूर्ण करावीत. इमारतीमध्ये दिव्यांगाना उपलब्ध करून द्यावयाच्या सोयीबाबत शासनाच्या सूचनांच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नंदुरबार संस्थेचा समावेश केंद्र शासनाच्या इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू मेडीकल कॉलेज टॅच्डर टू डिस्ट्रीक्ट वुईथ रेफरल हॉस्पिटल फेज-३ मध्ये करण्यात आला आहे. सदर योजनेअंतर्गत निर्माण करण्यात येणार्या लेखाशिर्षातूनही सदर बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या बांधकामामुळे जिल्ह्यासाठी उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत.
गेल्या शैक्षणिक वर्षापासून नंदुरबार येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले असून त्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक मनुष्यबळासाठीदेखील पालकमंत्री ॲड. पाडवी पाठपुरावा करीत असून त्याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासनदेखील वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांनी दिले आहे.