नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्ह्यातील धडगांव-वडफळ्या-रोषमाळ-ब्रु नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या निवडणूकीसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे.मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या परिपत्रकानुसार मतदार कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना सुट्टी देण्यात यावी. सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आदी सर्वांना लागू राहील. यात खासगी कंपन्या, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे,व्यापार, औद्योगिक उपक्रम, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर आणि अन्य आस्थापनांचा देखील समावेश आहे.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास त्यांना मतदान क्षेत्रातील कामगारांना सुट्टी ऐवजी दोन तासाची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना दोन तासांची भरपगारी सवलत मिळेल याची दक्षता सर्व आस्थापनांनी घ्यावी. असे जिल्हा सह-आयुक्त अनंत जवादवार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.









