नवापूर | प्रतिनिधी
नवापूर येथील धडधड्या रेल्वे गेटजवळ वाद मिटवण्यासाठी गेलेल्या काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक आशिष मावची यांना बंदूक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी जीवघेणा हल्ला केला या घटनेत आशिष मावची यांचा हात फ्रॅक्चर झाला असून , पोटाला व कमरेला दुखापत झाली आहे . या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
नवापूर शहरातील धडधड्या रेल्वे गेटजवळ रविवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास लक्झरीचा मोटारसायकलला कट लागल्याने वाद निर्माण झाला . हा वाद मिटवण्यासाठी नवापूर नगरपालिकेचे काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक आशिष फत्तू मावची गेले असता पांढऱ्या रंगाच्या स्विफ्टमधून आलेले संशयित आरोपी वैभव सखाराम गावित , शाहरुख खाटीक व त्यांच्या तीन मित्रांनी आशिष मावची यांना लाकडी दांडा , स्टीलचा रॉड , हाताबुक्क्यांनी मारहाण केली . या घटनेत आशिष मावची यांचा हात फ्रॅक्चर झाला . या वेळी वैभव सखाराम गावित यांनी मावची यांना बंदूक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली . याविषयी आशिष मावशी यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळे तपास करत आहे .










