नंदुरबार | प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त माहितीनुसार वायव्य आणि लगतच्या मध्य भारत आणि गुजरातच्या बहुतेक भागात तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता असून त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात उद्यापासून कमाल आणि किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान १७ डिसेंबर रोजी किमान तापमान १५.८ नोंदवले गेले. दरम्यान प्राप्त हवामान अंदाजानुसार जिल्ह्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहील आणि किमान तापमान १० अंश सेल्सिअस व कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते असा अंदाज जिल्हा कृषि हवामान केंद्र, डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी वर्तवला आहे. जिल्ह्याच्या विशेषतः अक्राणी आणि अक्कलकुवा तालुक्यात थंडी जास्त जाणवेल.
शेतकर्यांनी थंडीपासून संरक्षणासाठी पिकास पाणी द्यावे जेणेकरून जमिनीचे तापमान नियंत्रित राहील. थंडी पासून संरक्षणासाठी केळी आणि पपईच्या फळास प्लास्टिक बॅगचे आवरण लावावे. थंड वार्यापासून जनावरांचे, कोंबड्यांचे संरक्षण करावे. थंडीमुळे जनावरांना न्युमोनिया हा आजार होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान वाढते व त्यांचे खाणे पिणे कमी होते. यासाठी थंडीपासून जनावरांचे संरक्षण करावे. थंड वातावरणात कोंबड्या जास्त प्रमाणात बळी पडतात. त्यासाठी शेडमध्ये ७ दिवसांपर्यंत पक्षी व्यवस्थित ब्रूडिंग करावी. तापमान वाढवण्यासाठी १०० व्हॅटचे बल्ब लावावेत आणि शेडला पडदे लावावे. पक्षांना उर्जा व प्रथिनेयुक्त पशु आहाराचा समावेश करून आहार वाढवावा असे आवाहन कृषि विज्ञान केंद्राचे कृषि हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी केले आहे.










