नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तहसील कार्यालयात राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजना व स्वर्णजयंती महाराजस्व अभियानांतर्गत जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते दोन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना धनादेश व शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले .
राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत ४९ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांची मदत देण्यात आली.
यावेळी प्रभारी उपविभागीय नितीन सदगिरी , अधिकारी तहसीलदार भाऊसाहेब थोरात , नायब तहसीलदार नितीन पाटील , पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार रमेश वळवी , नायब तहसीलदार राजेश अमृतकर उपस्थित होते . कार्यक्रमात राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत ४९ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार असे एकूण 9 लाख 80 हजार रुपयांची मदत देण्यात आली होती . या लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले . दरम्यान , तालुक्यातील आराळे येथील सुदाम बारकू जाधव , तर मांजरे येथील प्रवीण आसाराम पाटील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे वारस
श्रीमती भटूबाई सुदाम जाधव व पुनम प्रवीण पाटील या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे अर्थसाहाय्य शासनाकडून मंजूर करण्यात आले होते . यातील ३० हजार रुपयांचा धनादेश कार्यक्रमात वारसांना देण्यात आला . तर दोघा मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने ७० हजार रुपये बँकेत मुदत ठेव करण्यात आले आहेत . ही रक्कम मुदत संपल्यानंतर वारसांना दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे . कार्यक्रमात स्वर्णजयंती योजनेंतर्गत तालुक्यातील लाभार्थ्यांना 10 शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. यावेळी सूत्रसंचालन प्रा . माधव कदम यांनी तर आभार रमेश वळवी यांनी मानले . यशस्वीतसाठी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .