नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यातून ऊसतोडीसाठी स्थलांतरीत होणाऱ्या नागरिकांचे मोठे प्रमाण आहे.जिल्ह्यातही इतर जिल्ह्यातून ऊस तोडीसाठी आलेल्या मजुरांची संख्या मोठी आहे.दिवस रात्र करीत ऊसतोड करीत गोड साखर तयार होण्यासाठी यांचे प्रयत्न दिसतात, मात्र अवकाळी पावसामुळे नटरंग चित्रपटाचे खेळ मांडला या गाण्याचे बोल आठवत गोड साखरेची कडू कहाणी समोर आली.यातच मानवतेची झलक ही दिसून आली.



नंदुरबार जिल्ह्याला तीन साखर कारखाने लाभलेले आहेत.त्यामुळे याठिकाणी ऊस लागवड मोठया प्रमाणात होते.ऊस लागवड अधिक असल्याने ऊस तोड कामगारांची मोठया प्रमाणात आवश्यकता भासते.त्यामुळे पर जिल्ह्यातून अनेक कामगार आपल्या बैलगाडीसह या ठिकाणी वास्तव्याला येत असतात. उसाच्या लागवडीच्या दृष्टीने विचार केला तर सर्वाधिक लागवड शहादा तालुक्यात आहे.कारखाने ऊस तोड कामगार याठिकाणी आणण्याचा प्रयत्न करीत असतात. तर बाहेरून येणारे ऊसतोड कामगार आपल्या सर्व परिवारासह याठिकाणी वास्तव्याला येत असतात. आणि ज्या ठिकाणी उसाची तोड लागलेली आहे अशा ठिकाणी आपले तंबू मांडून त्या ठिकाणी वास्तव्य करीत असतात. मग त्या ऊस तोडणीला कितीही दिवस लागोत त्याप्रमाणे ते त्या त्या ठिकाणी वास्तव्य करीत असतात. कठीण परिस्थितीत ऊसतोड कामगार ही आपले कर्तव्य बजावत आहेत. ऊस तोड कामगार ज्या ठिकाणी ऊस तोड चालू राहते त्या ठिकाणी ते आपले बिर्हाड थाटत असतात. आपला मुक्काम त्या क्षेत्रातच ठेवत असतात ज्या ठिकाणी तोडणी चालू आहे.
आपल्या श्रमातून कारखाने व नागरिकांना साखरेचा गोडवा देण्याचा प्रयत्न करतात.मात्र दोन दिवसा पूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे गोड साखरेची कडू कहाणी दिसून आली. शहादा तालुक्यातील शेल्टी येथे अवकाळी रिमझिम पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे . दरम्यान , संततधार पाऊस सुरू असल्याकारणाने ऊसतोड कामगारांचे राहण्याच्या दृष्टीने खूप हाल होत आहेत. त्याच बरोबर ऊस तोड होत नसल्याने मजुरीही मिळणार नाही या चिंतेने ते ग्रासले आहेत.आपली लहान बालके त्यांच्या अंगावर धड कपडे नाहीत अशी बालके थंडीमुळे गारठले आहेत.त्यांना अंग झाकण्यासाठी कपडे नाहीत. त्याचबरोबर स्वयंपाकासाठी लागणारे लाकूड ही ओले झाल्यामुळे जळणासाठी ही लाकूड उपलब्ध होत नाही आहे त्यामुळे त्यांच्यासमोर खाण्यापिण्याचा ही प्रश्न निर्माण होत आहे.शेतात आपल्या झोपडीत मुक्काम करणाऱ्या या ऊस तोड कामगारांच्या झोपडीत पाणी घुसले.त्यामुळे त्यांचे प्रचंड हाल झाले.अशातच त्यांचे फोटो व व्हिडिओ गोड साखरेची कडू कहाणी , आयुष्यात खूप काही तक्रारी आहेत , पण हे पाहिले की त्या शुन्य वाटतात अशा मथळ्याखाली सोशल मीडियावर फिरत आहेत. ते पाहून गोड साखरेची चव देणाऱ्यांची कडू कहाणी दिसून आली.या ऊस तोड कामगारांना अशा वेळी शेल्टी (ता. शहादा) येथील प्रगतिशील शेतकरी यशवंत पाटील यांनी ऊसतोड मजुरांची होणारी अवहेलना पाहिली. दोन दिवसापासून त्यांची चूलही पेटत नसल्याने सर्व मजूर बांधवांना त्यांनी अन्नदान केले.यात यशवंत पाटील यांचे सर्व कुटुंब यात सहभागी होत ऊसतोड कामगारांच्या कुटुंबाला मदतीचा हात देत माणुसकीची झलक दाखवली.यावेळी आपसूकच नटरंग मराठी चित्रपटाचे खेळ मांडला या गाण्याची आठवण होते.








