धडगाव l प्रतिनिधी-
धडगाव-रोषमाळ-वडफळ्या नगरपंचायतीचा नुकताच निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. त्यानुसार दि. १ डिसेंबर पासून नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र भरण्याच्या दुसऱ्या दिवशीही एकही अर्ज दाखल झाला नाही.
अर्ज दाखल प्रक्रियेत दुसऱ्या दिवशी एकाही इच्छुक उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. दरम्यान पक्षश्रेष्ठींकडून उमेदवार निश्चिती व कागद्पात्रांची पूर्तता या मुळे अद्याप अर्ज दाखल झाला नसल्याचे समजते.दरम्यान यंदाच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत अनेकांनी उमेदवारीसाठी कंबर कसली असून शिवसेना , काँग्रेस व भाजपा हे तीन प्रमुख पक्ष निवडणूक रिंगणात आपले उमेदवार उतरवत आहेत. यात पक्षीय बलाबल बघता प्रामुख्याने शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये सरळ लढत होणार असल्याचे चित्र आहे. पक्ष श्रेष्टींकडून अद्याप उमेदवारांची चाचपणी सुरु असून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी शिवसेना व काँग्रेस दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. येत्या ७ डिसेम्बर पर्यंत उमेदवारांचे नामनिर्देशन मागविण्याची मुदत असून येत्या दोन दिवसात वार्ड निहाय उमेदवार निश्चित होवून चित्र स्पष्ट होईल.
असे असेल आरक्षण
नगरपंचायतीच्या वार्ड निहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती. त्यानुसार आरक्षण लागू करण्यात आले आहे. यात वार्ड क्रमांक १,२,१०,११,१६ व १७ हे अनुसूचित जमाती महिला राखीव , वार्ड क्रमांक ४,५,६,७ व १२ हे अनुसूचित जमाती सर्वसाधारण राखीव , वार्ड क्रमांक ८ अनुसूचित जाती सर्वसाधारण, वार्ड क्रमांक ९ अनुसूचित जाती महिला राखीव, वार्ड क्रमांक १४ व १५ सर्वसाधारण महिला राखीव तर वार्ड क्रमांक ३ व १३ सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे.








