नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील लोणखेडा केंद्रातील जि.प. शाळा खोडसगाव येथे शासन परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनेनुसार शाळा शुभारंभ व नवागतांचे स्वागत कार्यक्रम नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते व शिक्षणाधिकारी( प्राथमिक) डाॅ.राहुल चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

प्रथम पानाफुलांनी सजवलेल्या बैलगाडीतून इ.१ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणूकीत सीईओ, शिक्षणाधिकारी तसेच पालक सहभागी होऊन उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले. मिरवणुकीत सरपंच जगलाल ठाकरे, शा.व्यवस्थापन समिती अध्यक्ष मांगिलाल ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,ग्रामस्थ, पालक,विस्तार अधिकारी ठाकरे, केंद्रप्रमुख सुरेश तावडे , मुख्याध्यापक, शिक्षक,विद्यार्थी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर इ. सहभागी झाले.शाळा प्रवेश उत्सवाचे मुख्य कार्यकारी अधिकारी,शिक्षणाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही व पेन,बिस्किट पुडे वाटप करण्यात आले. प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ.राहूल चौधरी यांनी जिल्ह्यातील शाळा शुभारंभ व नवागतांचे स्वागत याबाबत सभेत मार्गदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी शाळा शुभारंभ व नवागतांचे स्वागत कार्यक्रमास मार्गदर्शन करतांना सदर कार्यक्रमाचे छान नियोजन केल्याने सर्वांना शुभेच्छा देऊन समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी शिक्षकांनी विशेष लक्ष देऊन विद्यार्थी गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करून सदर आवाहन शिक्षकांनी स्विकारून योगदान द्यावे असे आवाहन श्री. गावडे यांनी केले. यावेळी श्री.गावडे यांनी शाळेतील सर्व वर्गांची पाहणी करून तसेच व्हर्चुअल क्लासरूम व कराडीपाथ एज्युकेशन कंपनीच्या डिजिटल साहित्याची प्रत्यक्ष पाहणी करून शिक्षकांनी सदर डिजिटल साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कसे शिक्षण दिले जाते याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
डिजिटल माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण कसे देता येईल यासाठी १०० टक्के विद्यार्थी उपस्थित ठेऊन दर्जेदार शिक्षण दिले जाईल यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डाॅ.राहूल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मराठे, सर्व शिक्षक, केंद्रप्रमुख श्री.तावडे , विस्तार अधिकारी, श्री. ठाकरे , सरपंच जगलाल ठाकरे , अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्री. तावडे यांनी केले. सूत्रसंचालन नंदकिशोर पाटील यांनी केले.








