तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील तलावडी शिवारात अज्ञात माथेफिरूने लावलेल्या आगीत तोडणीस आलेल्या दहा एकर क्षेत्रातील वरील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. यात शेतकऱ्यांचे सुमारे आठ ते दहा लाखाचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, तळोदा येथील शेतकरी निलेश दत्तात्रय वाणी यांचे तलावडी शिवारातील दहा एकर क्षेत्रात ऊसाची लागवड केली होती. दि.२७ नोव्हेंबर रोजी दुपारी साधारण दोन वाजेच्या सुमारास अज्ञात माथेफिरूने ऊसाला आग लावल्याने ऊसाने पेट घेतला. क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण केले. यात दहा एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला. यात साधारण आठ ते दहा लाखाचे नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती कळताच शेतकरी शेतात पोहचतो तोपर्यंत ऊस जळून खाक झाला होता. तरी तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी यांच्याकडून करण्यात आली आहे.










