तळोदा l प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून स्वच्छ सर्वेक्षण हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाचा २०२१ या वर्षीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून, नाशिक विभागातून तळोदा नगरपरिषदेस उत्कृष्ट काम केल्याबद्दल कांस्य पदकाने गौरविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सपना वसावा यांना आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.
नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यासाठी व नागरिकांना स्वच्छतेच्या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात तळोदा पालिकेना २०२०- २०२१ चा सर्वेक्षणात कांस्य पदक पटकविण्याचा मान तळोदा पालिकेला मिळाला आहे.. त्यानिमित्त पालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून तळोदा पालिकेने शहरात स्वच्छतेला मोठ्या प्रमाणात महत्व दिलेले दिसून येत आहे. शहरातील नवीन वसाहतीत घंटा गाडी नियमित फिरविण्यापासून तर शहरातील विविध भागात नियमित स्वच्छचेची कामे करून घेण्यासाठी पालिकेतील लोकप्रतिनिधी व प्रशासन तत्पर असल्याचे चित्र आहे. त्याचीच प्रचीती म्हणून तळोदा पालिकेत यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक विभागातून तळोदा नगर परिषदेस उत्कृष्ट काम केल्याबद्दल कास्य पदकाने गौरविण्यात येणार आहे..
-२०१७ २०१८ मध्ये स्वच्छता सर्वेक्षणात तळोदा पालिका ३०७ क्रमांकावर होती तर गेल्या वर्षी २०१८- २०१९ मध्ये १८६ क्रमांक तळोदा पालिकेने पटकाविला होता. २०१९-२०२० मध्ये १९० असे क्रमांक पटकवत स्वच्छतेचा आलेख उंचावला असून २०२०-२१ यावर्षी तळोदा पालिकेने झेप घेत १५६ क्रमांक मिळवला असून नाशिक विभागात द्वितीय पालिका ठरली असून या स्पर्धेत कांस्य पदक पालिकेला जाहीर करण्यात आले आहे. पुढील काळात शहरात स्वच्छतेच्या बाबतीत मोठी कामे केली जाणार असल्याचे नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी सांगितले. लवकरच शहरातील घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यन्वित करण्यात येणार आहे. तसेच पालिकेने स्वत:च्या मालकीचे गटारींची स्वच्छता करण्याचे मशीन खरेदी केले असून, यामुळे गटारींचा स्वच्छतेचा प्रश्न सुटणार आहे. पालिकेने कांस्य पदक प्राप्तीबद्दल नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी व मुख्याधिकारी सपना वसावा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक आश्विन परदेशी, मुकादम सुरेंद्र वळवी, अजय गोजरे आदीसह कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे. दरम्यान, याप्रसंगी कर्मचा-यांनी स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला होता त्या अनुषंगाने त्यांनी कामगिरी केले असल्याचे मत अजय परदेशी यांनी व्यक्त केले.
कोरोना कालावधीत स्वच्छतेचा ठेका संपला असताना प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी विलंब झाला होता, अश्या अवघड परिस्थितीत ही पालिकेने स्वच्छतेची जबाबदारी पार पाडली आहे.