नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे मेहतर वस्तीत थकीत वीज वसुलीसाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यांसह कर्मचार्यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील मेहतरवस्तीत महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे अभियंता गोपाल वराडे हे त्यांच्या पथकासह थकीत वीज बिल वसुली कारवाईसाठी गेले असता त्याचे वाईट वाटून सागर कडोसे व रवि डागोर हे या पथकाजवळ येवून सांगू लागले की, आम्ही बिल भरणार नाही व वीज कनेक्शनही कट करू देणार नाही असे सांगितले. यावेळी वीज वितरण कंपनीचा कर्मचार्यांना शिवीगाळ करण्यात आली. यावेळी गोपाल वराडे व पथकातील कर्मचारी हे समजूत घालण्यासाठी गेले असता सागर कडोसे व रवि डागोर यांनी बेकायदेशीर जमाव जमवून सहाय्यक अभियंता गोपाल वराडे, निलेश माळी यांना काठीने मारहाण करत चंद्रशखेर जगताप, रविंद्र देवाजी गावीत यांना शिवीगाळ करत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सहायक अभियंता गोपाल रमेश वराडे रा.विद्यानगर (नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात सागर सुखदेव कडोसे, रवि शाम डागोर व गल्लीतील ८ ते १० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीसांनी सागर कडोसे व रवि डागोर यांना अटक केली असून पुढील तपास पोसई मनोज पाटील करीत आहेत.








