नंदुरबार l प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार 10 डिसेंबर 2021 रोजी मतदान, तर 14 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक विभागाने सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप जगदाळे यांनी दिले.
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. जगदाळे यांच्या दालनात आज सकाळी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड (धुळे), सुधीर खांदे (नंदुरबार), उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे (शिरपूर), उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर, उपजिल्हाधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे आदींसह नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. जगदाळे म्हणाले, विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या प्रत्येक विभागाने सूक्ष्म नियोजन करीत सोपविलेली जबाबदारी पार पाडावी. निवडणुकीसाठी गठित पथकांनी आपापले अहवाल दररोज सादर करावेत. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी मूलभूत सोयीसुविधांची पूर्तता करावी. मतदान आणि मतमोजणीचे नियोजन करावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मतदार व मतदान केंद्रांवर नियुक्त पथकातील सदस्यांना मास्क, सॅनेटायझर पुरवावेत. मतदान केंद्रांवर आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकाऱ्याचा समावेश असलेल्या पथकाची नियुक्ती करावी. या पथकाने मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांची थर्मल गन आणि पल्स ऑक्सिमीटरने तपासणी करावयाची आहे. मतदान व मतमोजणीच्या दिवशी अद्ययावत माहिती भारत निवडणूक आयोगाला वेळेत उपलब्ध होण्यासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा, असेही सांगितले.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. अंतुर्लीकर यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच मतदानासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण 27 नोव्हेंबर 2021 रोजी होईल, असे सांगितले.








