नंदुरबार | प्रतिनिधी-
एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या संत तुकाराम महाराजांच्या सुंदर वचनाप्रमाणे गरजूंना आपणाकडून जे जे शक्य होईल ती ती मदत आपण केली पाहिजे. मात्र मदत करताना आर्थिक हितसंबंध येता कामा नये, याची काळजी आपण घेतली पाहिजे.याचाच प्रत्यय नंदुरबार तालुक्यातील आसाने येथे आला.सामाजीक कार्यकर्त्याने साद देताच तहलिदारांनी त्याला प्रतिसाद दिल्याने वयाच्या ८५ व्या वर्षी निराधार आजीला दोन दिवसातच हक्काचे रेशनकार्ड मिळाले.

राज्याचा एकीकडे अमृत महोत्सव साजरा होतोय,अन दुसरीकडे राहायला घर नाही म्हणून घराचा पत्ता नाही.पत्ता नसल्यामुळे रेशन कार्ड नाही.रेशनकार्ड नाही,म्हणून मतदानात नाव नाही.मतदान कार्ड नाही म्हणून आधार कार्ड नाही असे अनेक समस्यांनी ग्रासलेल्या नंदुरबार तालुक्यातील आसाने येथील ८५ वर्षीय आजीबाई तापाबाई लहाना ठेलारी या जंगलात राहुन मेंढ्या व कोंबड्या चारणे मिळेल तिकडे चार्यासाठी स्थलांतर करणे,अशा अनेक अडचणीत सापडलेल्या. आजी तशी ठेलारी समाजाची तापाबाई लहाना ठेलारी या आजी अडाणी दोन तरणीबांड पोरं १५ -१६ वर्षांपूर्वी एक तालुक्यातील काकरदे येथे तर दुसरा न्याहली येथील पूलावरून मोटार सायकलसह पडून अपघातात मरण पावली. शेती नाही,घरं नाही.जंगलात उघड्यावरच राहते.अगदी कोरोना काळात २ वर्ष आजीला रेशन वा कुठलीच मदत मिळाली नाही,गावातील ओळखीच्या घरांनी आजीला तांदूळ वगैरे दिले.आजी वयाच्या ८५ व्या वर्षी ही स्वाभिमानाने जगतेय,पण भीक मागत नाही.आजीची उपजीविका कुक्कुटपालनातून अंडी विक्री करून होतेय.
दरम्यान आसाने येथील सामाजिक कार्यकर्ते व जयहिंद फाउंडेशनचे अध्यक्ष समाधान पाटील यांनी आजीचा जगण्यासाठीचा संघर्ष पहिला व मदत करायचे ठरवले.आजीला रेशन कार्ड काढायचा व निराधार योजनेचा पगार चालू करून देण्याचा निर्णय घेतला.परंतु कागदपत्रे नसल्यामुळे या, ना,त्या अडचणी येत होत्या.शेवटी हरवलेले आधार कार्ड नवीन काढून गावातील एका जणाने आजीला भाडेकरू म्हणून घराचा उतारा दिला.त्यानंतर समाधान पाटील यांनी बँक पासबुक बनवले, आजीला स्व-खर्चाने नंदुरबार घेऊन जाऊन वेंडर कडून फार्म भरून घेतले, येथेही वेंडर मनोहर मिस्त्री यांनी आजीची परिस्थिति पाहून १ रुपया ही घेतला नाही. नेहमी कड़क स्वभावाचे दिसणारे नंदुरबार तहसिलदार भाऊसाहेब थोरात व पुरवठा शाखेतील कर्मचार्यांनी आजीची परिस्थिति पाहून २ दिवसात रेशनकार्ड काढून दिले.निराधार योजनेसाठी लागणारा २१ हजारचा उत्पन्न दाखला लगेच काढून देण्याचे आश्वस्त केले,अन तो ही ३-४ दिवसात दिलाच. लवकरच आजीचा निराधार योजनेचा मानधनाचे प्रकरण जमा करण्यात येणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या सुंदर वचनाप्रमाणे गरजूंना आपणाकडून जे जे शक्य होईल ती ती मदत केल्यानेच वयाच्या ८५ व्या वर्षी निराधार आजीला दोन दिवसात रेशनकार्ड मिळाले.

सत्कार्यासाठी फक्त पैसा लागत नसतो.तेव्हा तुमची स्थिति व परिस्थिति देखील तेवढीच महत्वाची असते,जेवढं तुमचं वागणं व बोलणं असतं असे म्हणत जयहिंद फाउंडेशनच्या माध्यमातून समाधान पाटील यांनी अनेक सामाजिक कामे हाती घेऊन दिन-दुभळ्याना नेहमीच मदतीचा हात दिला आहे.








